टोमॅटोची 13 हजार क्रेट विक्री ; गायकर दाम्पत्य झाले करोडपती
ओतूर : जुन्नर तालुक्यातील पाचघर येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम भागोजी गायकर यांचे मुलगा ईश्वर व सून सोनाली गायकर या दाम्पत्याने आपल्या बारा एकरच्या शेतीच्या क्षेत्रामध्ये टोमॅटो पिकातून एक कोटी तीस लाख रुपये मिळवले आहेत अवकाळी पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता पण आजच्या मिळालेल्या बाजारभावामुळे शेतकरी आनंदी वातावरणात जगत आहे. गेले दोन वर्षे टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते; परंतु आज महाराष्ट्रात नव्हे तर देशात टोमॅटोचे भाव तेजीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळते.
गायकर यांना टोमॅटो विक्रीसाठी नारायणगाव येथील बाजार समिती जवळ असल्याने त्यांनी आतापर्यंत 13 हजार क्रेटची विक्री केली आहे. त्यांच्या क्रेटला हजार ते अडीच हजार रुपये दर मिळाला.
पाचघर या ठिकाणी चिल्हेवाडी धरणाचे मुबलक पाणी असल्याने टोमॅटो बाग उत्कृष्ट आहे. या बागेमध्ये अनेक महिलांना यामुळे रोजगाराची संधी मिळाली. यावर्षी गायकर दापत्याने शेतीची मशागत फवारणी फळ तोडणे क्रेट भरणे अतिशय नियोजनबद्ध करून शेती व्यवसाय करत आहे. शेती हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय आहे.
काही दिवसांपूर्वी नारायणगाव टोमॅटो मार्केट येथे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांच्या हस्ते ईश्वर गायकर यांचा सत्कार करण्यात आला.