डुलकी लागल्यास एसटी चालकाला उठवणार मोबाईल ॲप?
मुंबई: मध्यरात्रीच्या वेळेस चालकांना झोप लागून होणारे अपघात टाळण्यासाठी उत्तराखंड राज्याच्या परिवहन विभागाने मोबाईल अॅप तयार केले आहे. त्याच प्रकारचे मोबाईल अॅप तयार करुन चालकांच्या डुलकीमुळे होणारे अपघात रोखण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या अॅपमध्ये चालकांची देहबोली आणि डोळ्यातील पापण्यांच्या हालचाली टिपण्यात येतात. ठराविक वेळेनंतर चालकाला मध्यरात्री झोप आल्यास इशारा देऊन चालकांना दक्ष राहण्याच्या सूचना अलार्मच्या मदतीने या अॅपदवारे देण्यात येतात.
एसटीचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. परंतु गेल्या काही वर्षात एसटीच्या अपघातांमध्ये देखील वाढ झाल्याचे दिसून येत आहे. रस्ते अपघातांमध्ये ९० टक्के या मानवी चुका कारणीभूत आहेत. वेगाने गाडी चालविणे, ओव्हर टेक करणे, मद्यप्राशन करुन गाडी चालविणे, सतत वाहन चालविल्यामुळे चालकाला झोप येणे अशा विविध कारणांमुळे अपघात होत आहेत. यामुळे चालकांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून उत्तराखंड राज्याचा परिवहन विभाग वापरत असलेल्या अॅपचा आधार घेतला जाणार आहे. पाऊस कमी झाल्यानंतर एसटीतील वरिष्ठ अधिकारी उत्तराखंडमध्ये जाणार आहेत. प्रत्यक्ष पाहणीत तंत्रज्ञान प्रवासी सुरक्षेसाठी यशस्वी ठरल्यास याचा वापर एसटी चालकांसाठी करण्यात येणार आहे.
मोबाईल ॲप काय करते?
बस सुरू करण्यापूर्वी चालकाने आपल्या मोबाइलमधील अॅप सुरू करुन मोबाइल डॅशबोर्डवर ठेवायचा आहे. या अॅपमध्ये चालकांच्या देहबोली आणि डोळ्यातील पापण्यांच्या हालचाली टिपण्यात येतात. ठराविक वेळेनंतर चालकाचा स्टेअरिंगवर हात नसल्यास किंवा मध्यरात्री झोप आल्यास इशारा देऊन चालकांना दक्ष राहण्याच्या सूचना अलार्मच्या मदतीने देण्यात येतात. महत्वाचे म्हणजे चालकांनी काय करावे आणि काय करू नये या सूचनांसह चालकांचे मूल्यांकन करण्याची सुविधा या अॅपमध्ये आहे.
उत्तराखंड राज्यातील बसमध्ये चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वापरात असलेले मोबाइल अॅप यशस्वी ठरत असल्याचे दिसते. सध्या एसटीतील चालकांसाठी या मोबाइल अॅपचा अभ्यास सुरू आहे. उत्तराखंडमध्ये सध्या पावसाचे प्रमाण जास्त आहे. पाऊस कमी झाल्यानंतर एसटीचे वरिष्ठ अधिकारी उत्तराखंडमध्ये जातील. प्रत्यक्षात त्या मोबाइल अॅपची पाहणी करतील. त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल.
-शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ