संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान परस्पर बंद, लाभार्थी वंचित
नाशिक:महापालिका कार्यक्षेत्रातील संजय गांधी निराधार येाजनेतील लाभार्थी परस्पर अपात्र ठरवून त्यांचे लाभ गेल्या सहा महिन्यांपासून बंद करण्याचा प्रकार करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे लाभार्थी अपात्र ठरविल्याबाबत लाभार्थींना कोणतीही माहिती न देता त्यांना योजनेतून बाद करण्यात आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेत दिव्यांग, कुष्ठरोगपीडित, ज्येष्ठ निराधार आदींचा समावेश आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या लाभार्थींना लाभ दिला जातो. आर्थिक लाभाची ही योजना असल्याने अनेक निराधार, ज्येष्ठ यांना योजनेचा मोठा दिलासा मिळतो; परंतु अचानक योजनेतून बाद केल्याने गेल्या सहा ते सात महिन्यांपासून लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे लाभाची वाट पाहून सहा ते सात महिने झाले तरीही अनुदान मिळत नसल्याने चौकशी केली असता लाभ बंद करण्याची माहिती देण्यात आल्याने लाभार्थींना धक्काच बसला.
याप्रकरणी ठाकरे गटाने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे गंभीर प्रकरणाचे लक्ष वेधले. याप्रकरणी देण्यात आलेल्या निवेदनात संजय गांधी निराधार योजना कार्यालयाने नियमांचा भंग करीत चुकीच्या पद्धतीने योजनेतून लाभार्थींना बाद केल्याचे म्हटले आहे. लाभार्थी पात्र आहे की नाही यासाठी वर्षातून एकदा तपासणी करून पात्र-अपात्रतेचे निकष तपासून लाभ बंद करण्याची तरतूद आहे. अपात्र ठरविण्याबाबतची कारणे लाभार्थींना कळविणे अपेक्षित असताना या लाभार्थींना कोणतेही कारण देण्यात न येता परस्पर त्यांना लाभातून बाद करण्यात आले.
निकषांचे उल्लंघन करून चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्यांचे लाभ सुरू असताना पात्र आणि गरजू लाभार्थी असतानाही त्यांना अपात्र ठरविण्याचा प्रताप विभागाने केल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे.