युक्रेनमध्ये शांतता नांदण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या भूमिकेचं स्वागत; अमेरिकेने व्यक्त केलं मत
रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये गेल्या दीड वर्षांपासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध संपवण्याचा कित्येक देशांकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्याचा अजूनही काही परिणाम होत नाही. त्यामुळे युक्रेनमधील शांततेसाठी जर भारताने प्रयत्न केले, तर अमेरिका नक्कीच त्याचं स्वागत करेल असं अमेरिकेने म्हटलं आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता मॅथ्यू मिलर सोमवरी पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना असं विचारण्यात आलं. की रशिया-युक्रेन युद्धात इतर देशांची काय भूमिका असू शकेल? यावर उत्तर देताना, “भारत किंवा अन्य कोणताही देश याठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करू.” असं मॅथ्यू म्हणाले.
रशियाचा धोरणात्मक पराभव
या युद्धात रशियाचा धोरणात्मक पराभव झाला आहे. त्यांच्या सैन्याचं आणि शस्त्रास्त्र साठ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसेच, जगातील त्यांचं स्थान देखील प्रभावित झालं आहे. अमेरिकेने लागू केलेल्या निर्बंधांमुळे रशियाची अर्थव्यवस्था देखील डळमळली आहे, असं मॅथ्यू म्हणाले.
युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न
हे युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व देशांचं आम्ही स्वागत करतो. युद्धाच्या सुरुवातीपासून युक्रेनची मदत करणाऱ्या सर्व देशांचा आम्ही सम्मान करतो, असं ते म्हणाले. सोबतच, भविष्यात याठिकाणी कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी जो देश पुढाकार घेईल, त्याचं स्वागत अमेरिका करेल; असंही मॅथ्यू यांनी यावेळी स्पष्ट केलं.