आ… इतके महाग टोमॅटो ! असे उद्गार काढल्याने ग्राहकाला मारहाण
पुणे: टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्याने ग्राहक आणि विक्रेत्यात अक्षरशः हाणामारी झाली. भाजी विक्रेत्याला राग अनावर झाल्याने त्याने ग्राहकाच्या तोंडावर चक्क वजन फेकून मारल्याने ग्राहक गंभीर जखमी झाला.
चंदननगर पोलिसांनी अखेर विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला. टोमॅटो 20 वरून 100 रुपये किलो झाल्याने सामान्य ग्राहक हैराण झाला आहे. चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत यावरून वाद विकोपाला गेल्याने ग्राहक व विक्रेत्यात तुंबळ हाणामारी झाली.
इतके महाग म्हणताच शिवीगाळ…
गोपाळ गोविंद ढेपे हे गलांडेनगर भागात राहतात. ते सुरक्षारक्षक असून, त्यांची परिस्थिती बेताची आहे. ते वडगाव शेरी येथील भाजी मंडईत सायंकाळी साडेसात वाजता भाजी आणण्यासाठी गेले. तेथे गेल्यानंतर भाजी विक्रेत्याला टोमॅटोचे भाव विचारल्यानंतर त्याने 80 किलो रुपये सांगितले. त्यावर ढेपे यांनी आश्चर्य व्यक्त करत ‘आ… इतके महाग टोमॅटो!’ असे उद्गार काढले. त्यावर विक्रेते अनिल गायकवाड याने शिवीगाळ करीत त्याला हाकलून देण्यास सुरुवात केली. तेव्हा ढेपे म्हणाले, ‘शिव्या देऊ नकोस.’ त्यावर गायकवाड चांगलेच भडकले. त्यावर त्याने ढेपे यांच्या तोंडावर बुक्कीने हल्ला चढवला.
माप मारून जखमी केले….
रागाचा पारा चढल्याने गायकवाड याने वजन काट्यातील वजन माप हातात घेऊन ढेपे यांच्या उजव्या गालावर फेकून मारले. त्यामुळे ढेपे यांचा गाल रक्तबंबाळ झाला. त्यानंतर ढेपे यांनी पत्नीला तत्काळ घटनास्थही बोलावून घेतले. पत्नीने पतीला ससून रुग्णालयात नेले. उपचार घेताच पत्नीने चंदननगर पोलिस ठाण्यात विक्रेता गायकवाड याच्या विरोधात तक्रार दिली आहे.
टोमॅटोवर वॉच ठेवावा लागणार
मध्यंतरी कांद्याने ग्राहकांच्या डोळ्याला पाणी आणले होते. आता टोमॅटोने खवय्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. टोमॅटोच्या वाढलेल्या दरावरून वाद पोलिस ठाण्यात जाईल असे कधी वाटले नव्हते. मात्र, चंदननगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या वादाने पोलिसही चक्रावून गेले असून, त्यांना आता चक्क टोमॅटोवर वॉच ठेवण्याची वेळ आली.