उत्तर भारतात पावसाचा धुमाकूळ ; 11 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडील राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजधानी दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान या राज्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे घडलेल्या दुर्घटनामध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यूची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या दुर्घटना देखील समोर आल्या आहेत.
हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू असल्याने मंडीमध्ये बियास नदी दुथडी भरून वाहत आहे. कुल्लू येथे बियास नदीच्या प्रवाहात राष्ट्रीय महामार्ग 3 चा काही भागही वाहून गेला आहे त्यामुळे अटल बोगदा आणि रोहतांगकडे जाणारी वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी दरडी देखील कोसळत आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एका कनिष्ठ आयुक्त अधिकार्यांसह (जेसीओ) दोन जवान वाहून गेले. लष्कराचे जवान सुरनकोट भागातील डोगरा नाला ओलांडत असताना ही दुर्घटना घडली. यामधील दोन जवानांचे मृतदेह सापडल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे. हिमाचल प्रदेशातील श्रीखंड महादेव यात्रेदरम्यान पार्वतीबागजवळील टेकडीवरून पडून एका यात्रेकरूचा मृत्यू झाला तर दोन जण बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती अधिकार्यांनी रविवारी दिली. मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे हिमाचल प्रदेशात रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान 9 आणि 10 जुलैसाठी यात्रा स्थगित करण्यात आली आहे. तसेच शिमला जिल्ह्यातील कुमारसैन भागातील माधोली गावात भूस्खलनाची घटना घडली ज्यामध्ये घर कोसळून 3 जणांचा (आई आणि दोन मुले) मृत्यू झाला.
दरम्यान, राजधानी दिल्लीत दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असून, संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. दिल्लीचे सर्व मंत्री आणि महापौर समस्याग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. सर्व विभागातील अधिकार्यांची रविवारची सुटी रद्द करण्यात आली आहे. या सर्व अधिकार्यांना फील्डवर उतरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मान्सून वार्यांमुळे दिल्लीसह उत्तर पश्चिम भारतात मुसळधार पाऊस पडत आहे. मोसमातील पहिल्या मुसळधार पावसाची नोंद येथे झाली आहे. तब्बल 41 वर्षांनंतर असा पाऊस पडला आहे. दिल्लीच्या हवामान केंद्र सफदरजंग वेधशाळेत रविवारी सकाळी 8:30 वाजेपर्यंत 24 तासांत 153 मिमी पावसाची नोंद झाल्याचे आयएमडीने म्हटले आहे. यापूर्वी 25 जुलै 1982 रोजी 24 तासांत 169.9 मिमी पावसाची नोंद झाली होती. यापूर्वी 10 जुलै 2003 रोजी दिल्लीत 133.4 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्याचवेळी 21 जुलै 1958 रोजी आतापर्यंत विक्रमी 266.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला असून, मध्यम पावसाचा इशारा दिला आहे.
दिल्लीत पावसाने मोडला 41 वर्षांचा रेकॉर्ड – दिल्लीत 40 वर्षांनंतर विक्रमी पाऊस झाला आहे. रविवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या 24 तासांत दिल्लीत 153 मिमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. 1982 नंतर जुलै महिन्यात एकाच दिवसात विक्रमी पाऊस झाला आहे. दिल्ली सरकारने सर्व विभागांच्या अधिकार्यांची रविवारची सुट्टी रद्द केली आहे. या सर्व अधिकार्यांना फील्डवर राहून व्यवस्था सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. देशाची राजधानी दिल्लीची पावसामुळे संपूर्ण सिस्टम कोलमडली आहे. संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. लोकांच्या समस्या व त्रास वाढला आहे. याच दरम्यान, परिस्थितीला तोंड देण्यासाठी दिल्लीचे अरविंद केजरीवाल सरकार पूर्ण मनुष्यबळासह फील्डवर उतरलं आहे. केजरीवालांनी सर्व विभागांच्या अधिकार्यांची रविवारची सुट्टी रद्द केली आहे.