‘शरद पवारांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला’; छगन भुजबळ यांचा दावा
मुंबई: सत्तेत सहभागी होण्यासाठी शरद पवार यांचे मन वळविण्याचा प्रयत्न मागील काही दिवसांपासून सुरू होता, पण त्यांची तयारी नव्हती. पवार सगळे काही मोघम सांगण्याचा प्रयत्न करीत होते. त्यानंतर आम्ही कायदेविषयक बाबींबद्दल मार्गदर्शन घेतले आणि शपथविधी सोहळय़ात सहभागी झालो, असे स्पष्टीकरण मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी केले. आम्ही सर्वजण शरद पवार यांना व्श्विासात घेऊन सांगत होतो तरीही ते काही केल्या राजी होत नव्हते. त्यामुळे अखेर आम्ही सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काळजीपूर्वक तयारी केली. यामुळे आम्हाला खात्री आहे की आम्ही अपात्र होणार नाही, असा दावा भुजबळ यांनी केला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हाच मूळ पक्ष असल्याबाबत आम्ही निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे अजित पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहतील, असेही त्यांनी सांगितले. जर दोन-चार लोकांना घेऊन पक्ष चालवायला लागलो तर जे लोक दहा-दहा वर्षे पक्षात आहेत ते नाराज होतात. नाराज लोक अजित पवार यांच्याकडे आले. त्यांनी पाठिंबा दिला आणि पुढले सगळे घडले असे भुजबळ म्हणाले.