ताज्या बातम्या

‘वर्ल्ड कप’च्या तोंडावर बांगलादेश क्रिकेटमध्ये भूकंप; दिग्गज खेळाडूची निवृत्ती


भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. सर्व संघ या स्पर्धेसाठी सज्ज होत असताना बांगलादेश क्रिकेटमध्ये भूकंप झाल्याचे पाहायला मिळतेय… बांगलादेशच्या वन डे संघाचा कर्णधार तमिम इक्बाल ( Tamim Iqbal) याने वर्ल्ड कप स्पर्धेला तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना निवृत्ती जाहीर केली आहे.
इक्बालने १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दिचा शेवट करण्याचा निर्णय आताच का घेतला हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार हार पत्करल्यानंतर बांगलादेशच्या कर्णधाराने हा निर्णय जाहीर केला. पत्रकारांना सामोरे जाताना तमिम प्रचंड भावूक झाला होता. बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही अद्याप वन डे संघाचा कर्णधार कोण, हे जाहीर केलेलं नाही. ट्वेंटी-२० व कसोटी संघाचे नेतृत्व अनुक्रमे शाकिब अल हसन व लिटन दास यांच्याकडे आहे. ३४ वर्षीय तमिमने मागच्या वर्षी ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती आणि त्याआधी तो एप्रिल महिन्यात आयर्लंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळला होता.

२००७ मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या तमिमने वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध मॅच विनिंग अर्धशतक झळकावले होते. त्याने वन डे क्रिकेटमध्ये १४ शतकांसह ८३१३ धावा केल्या आहेत आणि सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये वन डेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यानंतर तमिमचा क्रमांक येतो. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ७० सामन्यांत ३८.८९ च्या सरासरीने १० शतकांसह ५१३४ धावा केल्या आहेत. तमिमच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने ३७ पैकी २१ वन डे सामने जिंकले आहेत.

वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेशचे वेळापत्रक
७ ऑक्टोबर – बांगलादेश वि. अफगाणिस्तान, धर्मशाला
१० ऑक्टोबर – इंग्लंड वि. बांगलादेश, धर्मशाला
१४ ऑक्टोबर – न्यूझीलंड वि. बांगलादेश, चेन्नई
१९ ऑक्टोबर – भारत वि. बांगलादेश, पुणे
२४ ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका वि. बांगलादेश, मुंबई
२८ ऑक्टोबर- श्रीलंका वि. बांगलादेश, कोलकाता
३१ ऑक्टोबर – पाकिस्तान वि. बांगलादेश, कोलकाता
६ नोव्हेंबर – बांगलादेश वि. क्वालिफायर २, दिल्ली
१२ नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश, पुणे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button