पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये यंदा नवीन धोरणानुसारच प्रवेश
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये यंदा पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे प्रवेश नवीन शैक्षणिक धोरणानुसारच होणार आहेत. त्यासाठी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या अध्यापकांची दोनदिवसीय कार्यशाळा संबंधित महाविद्यालयांमध्ये घेण्याचे निर्देश विद्यापीठ प्रशासनाने दिले आहेत.
त्यासाठी विद्यापीठाकडून अनुदान देण्यात येणार आहे.
विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून लागू होणार आहे. त्यानुसार श्रेयांक आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
शासनाच्या निर्देशाप्रमाणे कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या संलग्न महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे वर्ग 1 ऑगस्ट 2023 पासून सुरू करायचे असल्याने त्यापूर्वी संबंधित अभ्यास मंडळांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने पदव्युत्तर पदवी वर्गाच्या प्रथम वर्षाचे अभ्यासक्रम तयार करून संबंधित अधिकार मंडळाच्या मान्यतेने जाहीर करण्यात येणार आहे.
नुकत्याच विद्या परिषद सभेत झालेल्या चर्चेनुसार अभ्यासक्रम तयार करण्यापूर्वी संबंधित अभ्यासक्रम शिकविणा-या अध्यापकांची कार्यशाळा त्यांच्या महाविद्यालयात, विद्यापीठ विभागात घेण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील संबंधित अध्यापकांची कार्यशाळा त्या-त्या अभ्यास मंडळावर अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या व कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील तदर्थ अभ्यास मंडळावर कुलगुरू यांनी नामनिर्देशित केलेले अध्यक्ष ज्या विद्यापीठ विभाग आणि संलग्न महाविद्यालयात कार्यरत आहेत तेथे दोनदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्याची परवानगी दिलेली आहे.
कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदव्युत्तर विभाग अभ्यासक्रम राबविणा-या महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी त्यांच्या महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी वर्गास अध्यापन करणा-या संबंधित अध्यापकांना कार्यशाळेस उपस्थित राहण्यासाठी प्राधान्याने कार्यमुक्त करावे, असे विद्यापीठ प्रशासनाने कळविले आहे.
…अभ्यासक्रम ठरविण्याची मुभा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ज्या महाविद्यालयांना स्वायत्त महाविद्यालयांचा दर्जा दिला आहे त्या महाविद्यालयांना त्यांचा वेगळा अभ्यासक्रम तयार करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी विद्यापीठाकडून वेगळी मान्यता घेण्याची आवश्यकता नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, स्वायत्तता दर्जा प्राप्त महाविद्यालयांचे, परिसंस्थांचे अभ्यास मंडळ, विद्यापरिषद, नियामक मंडळाने पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम तयार करताना ते विद्यापीठ अनुदान आयोग आणि महाराष्ट्र राज्याने जाहीर केलेल्या तरतुदी, अध्यापनाचे तास, अभ्यासक्रमाचा आशय-विषय आणि गुणवत्ता इत्यादी तसेच महाराष्ट्र शासनाने पारीत केलेल्या तरतुदी, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सादर केलेले अभ्यासक्रम हे सर्व नियमांची पूर्तता करून तयार केले आहेत असे गृहीत धरण्यात येईल. अशा अभ्यासक्रमांना विद्यापीठाकडून वेगळी मान्यता दिली जाणार नाही.
स्वायत्तता दर्जा प्राप्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्था नव्याने पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करू इच्छित असतील तर त्यांची माहिती विद्यापीठास मुदतीत सादर करावी. पदवी व पदव्युत्तर पदवी प्रस्थापित करण्याबाबत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील तरतुदीनुसार कार्यवाही पूर्ण करून पदवी, पदव्युत्तर पदवी प्रस्थापित झाल्यानंतर संबंधित स्वायत्तता दर्जा प्राप्त महाविद्यालयास, परिसंस्थेस विद्यापीठाकडून स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.