पंतप्रधानांच्या बंगल्यावरून ड्रोनच्या घिरट्या, दिल्लीत खळबळ, सुरक्षा यंत्रणा सतर्क
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दिल्लीतलं निवासस्थान असलेल्या परिसरात सोमवारी सकाळी मोठी खळबळ माजली होती. कारण पंतप्रधानांच्या बंगल्यावरून ड्रोन उडत असल्याचं सुरक्षा यंत्रणेच्या निदर्शनास आलं होतं.एसपीजीने (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) या ड्रोनची माहिती दिल्ली पोलिसांना दिल्यानंतर दिल्ली पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी पंतप्रधानांच्या निवास्थानी दाखल झाले. सकाळी साधारण ५ वाजता एसपीजीने नवी दिल्ली पोलिसांना यासबंधीची माहिती दिली होती. माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला. परंतु अद्याप कोणतंही ड्रोन पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.
हे ड्रोन नेमकं कोणाचं होतं याबाबत पोलीस तपास करत आहेत. तसेच ते ड्रोन पंतप्रधानांच्या निवास्थानापर्यंत कसं पोहचलं हा प्रश्नही अद्याप अनुत्तरित आहे. मुळात पंतप्रधानांचं निवास्थान असलेला परिसर नो फ्लाईंग झोनमध्ये येतो. तरीदेखील या परिसरात ड्रोन फिरताना दिसल्याने सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहेत.
दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, एनडीडी नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली होती की, पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ एक उडणारी वस्तू दिसली आहे. त्यानंतर आसपासच्या परिसरात शोध घेण्यात आला, परंतु अशी कोणतीही वस्तू सापडली नाही. त्यानंतर आम्ही एअर ट्रॅफिक कंट्रोल रूमशी (एटीसी) संपर्क साधला. त्यांनाही पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ अशी कोणतीही उडणारी वस्तू सापडली नाही.
पंतप्रधानांचं निवासस्थान ७, लोक कल्याण मार्गावर आहे. या रस्त्याचं आधीचं नाव ७, रेस कोर्स रोड असं होतं. तर पंतप्रधानांच्या बंगल्याचं अधिकृत नाव पंचवटी असं आहे. पंतप्रधानांच्या निवसस्थानाबाहेर कडेकोड सुरक्षा व्यवस्था असते. ही सुरक्षा व्यवस्था इतकी चोख असते की, अगदी पंतप्रधानांच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जरी पंतप्रधानांना भेटायला जात असेल तरी त्या व्यक्तिला अनेक सुरक्षा टप्पे पार करून जावं लागतं. तसेच दररोज पंतप्रधानांना भेटणाऱ्या लोकांची एक यादी त्यांचे सचिव तयार करतात. या यादीत ज्या व्यक्तीचं नाव असेल केवळ तीच व्यक्ती पंतप्रधानांना भेटू शकते. तसेच पंतप्रधानांना भेटायला जाणाऱ्या व्यक्तिंकडे ओळखपत्र असणं आवश्यक असतं. जे अनेक सुरक्षा टप्प्यांदरम्यान दिलं जातं.