ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनेक आमदारांना परत यायचे आहे; दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल: अनिल देशमुख


कराड: अनेक आमदारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांनी आम्हाला परत यायचे आहे, असे स्पष्टपणे सांगितले आहे.
त्यामुळे याबाबत एक दोन दिवसात संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. अनेक आमदार परत राष्ट्रवादीमध्ये आलेले दिसतील, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कराड येथील सर्किट हाऊसवर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

अनिल देशमुख यांनी प्रीतीसंगमावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन खासदार शरद पवार यांच्याबरोबर घेतले. त्यानंतर त्यांनी कराड सर्किट हाऊस येथे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर सुमारे अर्धा तास बंद खोलीत चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

अनिल देशमुख म्हणाले की, गुरुपौर्णिमेनिमित्त खासदार शरद पवार यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर शरद पवार महाराष्ट्रभर दौरे करणार आहेत. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना एकत्रितच आहेत. या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर माझी चर्चा झाली आहे. राज्यभर महाविकास आघाडीला वातावरण अतिशय चांगले आहे. पुढील सर्वच निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढणार आहोत.त्यामुळे वेगळे चित्र निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळेल, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.

ईडीच्या कारवाईबाबत विचारले असता आमदार अनिल देशमुख म्हणाले, महाराष्ट्राबरोबरच अनेक राज्यांमध्ये व एकूणच देशभर ईडी व सीबीआयच्या कारवाईबाबत आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. अशा परिस्थितीमध्येही आम्ही सर्वजण एकत्र येऊन राष्ट्रवादी पक्षाला मजबूत करण्यासाठी काम करणार आहे. मला खोट्या आरोपांमध्ये अडकवण्यात आले होते. माझ्यावर झालेल्या आरोपांची चौकशी झाली आणि हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेले. त्यावेळी अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, त्याचे कोणतेही पुरावे नाहीत, झालेले सर्व आरोप ऐकीव माहितीचे आहेत, असे प्रथम हाय कोर्टाने सांगितले. त्यावर नंतर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला, असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button