आमदार अपात्रतेबाबत लवकरच निर्णय
मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या निकालानुसार 30 जुलैपूर्वी शिंदे गटाच्या विरोधात निकाल येणार असल्याची शक्यता शपथविधी सोहळ्यानंतर व्यक्त होऊ लागली आहे.
16 आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. या निकालाने शिंदे पायउतार झाल्यास अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदी बसविण्याची खेळी भाजप खेळणार असल्याचे बोलले जाते.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने शिवसेनेत बंडखोरी करून बाहेर पडलेल्या आमदारांची अपात्रता, विधानसभा अध्यक्षांची निवड, शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी तसेच सत्तासंघर्षावेळी निर्माण झालेल्या इतर कायदेशीर पेचावर एकत्रितपणे सुनावणी घेतली होती. या घटनापीठाने निकाल देताना विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या विरोधात मत नोंदविले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देण्याबाबत न्यायालयाने कालावधी निश्चित सांगितला नाही, असे बोलून शिंदे गट आणि सरकारलाही दिलासा दिला होता.
नार्वेकर यांची ही भूमिका पाहून राष्ट्रवादी काँग्रेसने न्यायालयाच्या निकालाचा अर्थ समजून सांगताना मणिपूर राज्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा दाखला दिला होता. त्यानुसार नार्वेकर यांना आमदार अपात्रतेप्रकरणी तीन महिन्यांत निकाल देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट झाले.
आता राष्ट्रवादीच्या माध्यमातून किमान 35 आमदारांचे संख्याबळ सोबत आल्यामुळे शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेतला जाणार आहे. त्यासाठी नार्वेकर यांच्या माध्यमातून शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र केले जाऊ शकतात.
टांगती तलवार असलेले सोळा आमदार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, डॉ. बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमूलकर, रमेश बोरणारे आणि बालाजी कल्याणकर.