प्रफुल्ल पटेल मोदींच्या मंत्रिमंडळात? राजकीय नाट्याच्या दिल्लीत अशा घडल्या सुप्त घडामोडी.
मुंबई:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा असतानाच अजित पवार आणि त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने नवीन समीकरण सुरू झाले आहे. अशात काही दिवसांपूर्वी शिंदे आणि फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट या संपूर्ण घडामोडीमागे कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.
गृहमंत्री अमित शहा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शिंदे गटातील आमदार आणि खासदारांना अनुक्रमे राज्यात आणि केंद्रात अधिकची मंत्रिपदे मिळतील, यावर चर्चा झाल्याची माहिती होती. परंतु, याउलट झाल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. मुख्य म्हणजे दुपारी झालेल्या या शपथविधीने शिंदे गटात नाराजी पसरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ‘६ अ कृष्ण मेनन’ मार्गावरील निवासस्थानी रात्री साडेदहा वाजता भेट घेतली होती.
दोन तास झालेल्या बैठकीनंतर शिंदे व फडणवीस तातडीने मुंबईला परतले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी ३० जून रोजी, शुक्रवारी रात्री शिंदे व फडणवीस यांनी पुन्हा शहांची भेट घेतली होती. या दोन्ही बैठकीनंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे सांगितले जात होते. रविवारी अचानक अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे शुक्रवारी शिंदे व फडणवीसांनी तातडीने केलेला दिल्लीदौऱ्याचे इंगित उघड झाले.
प्रफुल्ल पटेल मोदींच्या मंत्रिमंडळात?
प्रफुल पटेल यांच्याविरोधात ईडीचा ससेमिरा लागला असल्याने ते भाजपशी जुळवून घेण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात होते. मध्यंतरी अजित पवार याचा संपर्क होत नसल्याचे वृत्त पसरले होते. त्यावेळी प्रफुल पटेलसह छगन भुजबळ आदी नेते अजित पवार यांच्यासोबत भाजपशी युती करण्यासाठी उत्सुक असल्याची बाबही समोर आली होती. या चर्चा रंगल्या असताना अजित पवार यांनी दिल्लीत येऊन अमित शहांची भेट घेतल्याचेही सांगितले जात होते. प्रफुल पटेल हे आता फुटीर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले असल्याने त्यांना मोदी सरकारच्या विस्तारामध्ये केंद्रीयमंत्री पद दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.