अजित पवार गटाचा प्रतोद ठरला! ‘या’ नेत्याच्या नावावर उपमुख्यमंत्र्यांनी केले शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात मागील साडेतीन वर्षांत तिसरा महाभूकंप झाला. यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे.
एकीकडे कराड येथे जाऊन शरद पवार यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन केल्याचे बोलले जात असताना आता दुसरीकडे, अजित पवार गटाने पक्षाचा प्रतोद निवडला आहे.
शरद पवारांच्या सल्ल्याने नवे विरोधी पक्षनेते आणि प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी रातोरात कोणाला कानोकान खबर होऊ न देता अचानक विधान सभा अध्यक्षांचे निवासस्थान गाठले. सुमारे दीड वाजता आव्हाडांनी विरोधी पक्षनेता आणि प्रतोद पदाचे पत्र घेऊन ते राहुल नार्वेकरांकडे सोपविले आणि त्यावर सही, शिक्काही घेतला. मात्र, यानंतर आता अजित पवार यांच्या गटाने प्रतोदपदी एका नेत्याची निवड केली आहे.
अजित पवार गटाचा प्रतोद ठरला!
अजित पवार यांच्यासोबत गेलेले आणि मंत्रीपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांची प्रतोद म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही दोन प्रतोद पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी आपल्याच गटाचा व्हीप लागू होणार असल्याचे सांगितले होते. यानंतर आता अनिल पाटील यांची प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. खुद्द अनिल पाटील यांनी सदर माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. आता अनिल पाटील व्हीप बजावतील, असे सांगितले जात आहे. तसेच उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यावर अजित पवारांचे बैठकांचे सत्र सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, ०५ जुलै रोजी अजित पवार यांनी वांद्रे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार, खासदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावल्याची माहिती देण्यात आली आहे. सर्व नेते, आमदार, खासदार यांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे, आतापर्यंत अजित पवारांना समर्थन देताना ३५ आमदारांनी सह्या केल्याचे पत्र सादर केले असल्याची महिती समोर आली आहे. मात्र यानंतर एकूण ४२ आमदार अजित पवारांना पाठिंबा दर्शवतील अशी माहिती मिळत आहे.