पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचेही डिजिटल प्रमाणपत्र मिळणार
मुंबई:राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आता पाचवी आणि आठवी या शालेय स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षांचेही डिजिटल गुणपत्रक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर 15 दिवसांच्या आत विद्यार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र व गुणपत्रक मिळणार आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षांसह परीक्षा परिषद टायपिंग व लघुलेखन परीक्षा, डी.एड. परीक्षा अशा विविध परीक्षांचे आयोजन करते. या परीक्षांचा निकाल लागल्यानंतर पात्र उमेदवारांपर्यंत प्रमाणपत्र व गुणपत्रक पोहोचण्यास किमान एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो, परंतु या पुढील काळात सर्व प्रमाणपत्र हे डिजिटल स्वाक्षरीने दिले जाणार आहेत. ही प्रमाणपत्रे कायमस्वरूपी परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे यापुढील काळात परीक्षा परिषदेला पत्र पाठवून त्याची पडताळणी करण्याची आवश्यकता राहणार नाही. विद्यार्थ्याला किंवा संबंधित संस्थेला किंवा नोकरीवर नियुक्त करणाऱ्यां अधिकाऱ्यांला विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी सहज करता येईल. या निर्णयामुळे ऑफलाइन पद्धतीमधील प्रमाणपत्र छपाई, वितरणासाठी येणारा वाहन खर्च, मनुष्यबळ व वेळ यामध्ये मोठय़ा प्रमाणावर बचत होणार आहे.
परीक्षा परिषदेने टायपिंग व लघुलेखन विषयासाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले आहे. यापुढील काळात पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, एनएमएमएस परीक्षा, डी.एड. परीक्षा अशा सर्व परीक्षांचे गुणपत्रक व प्रमाणपत्रही डिजिटल स्वरूपात देण्यात येईल.
शैलजा दराडे, आयुक्त, राज्य परीक्षा परिषद
फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा (जीसीसी) साठी टायपिंग व लघुलेखन विषयासाठी प्रविष्ट झालेल्या एकूण 62 हजार 706 विद्यार्थ्यांचे डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र परीक्षा परिषदेच्या आयुक्तांकडून ऑनलाइन स्वरूपात संबंधित संस्थांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. या प्रमाणपत्राची सत्यता पडताळण्यासाठी क्यूआर कोड स्पॅन करावा किंवा प्रमाणपत्रावरील नमूद केलेल्या संकेतस्थळावरील लिंकवर क्लिक करावे, त्यानंतर परीक्षेच्या नावाची निवड करावी, परीक्षा वर्ष व बैठक क्रमांक नमूद करावा, सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांची माहिती स्क्रीनवर पाहता येते, अशा सूचना परीक्षा परिषदेने दिल्या आहेत.