मराठवाडय़ात जून महिन्यात सर्वात कमी पाऊस; केवळ एक टक्के पेरण्या
लातूर : जून महिना संपून गेला तरी पावसाची दमदार हजेरी नसल्यामुळे मराठवाडय़ातील शेतकरी चिंतेत आहेत. केवळ एक टक्का पेरण्या आतापर्यंत झालेल्या आहेत. मृग नक्षत्र कोरडे गेले, आद्र्रा नक्षत्रात काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी नक्षत्र संपेपर्यंत दमदार पाऊस होईल की नाही याची शाश्वती देता येत नाही त्यामुळे यावर्षी खरिपाच्या पेरण्याची भिस्त पुनर्वसू व पुष्य नक्षत्रावर जाण्याची स्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल आहे.
देशात जून महिन्यात १९२३ साली २०.५ मिलिमीटर इतका कमी पाऊस झाला होता. २०१४ साली तो ३०.४० मिलिमीटर झाला तर यावर्षी तो ४१.३ मिलिमीटर झाला आहे. १९०१ नंतर देशात सर्वात कमी पाऊस होण्याचा प्रसंग यावर्षी जून महिन्यात उद्भवला आहे. यावर्षी भारतात जून महिन्यात सरासरी दहा टक्के कमी पाऊस झाला आहे. मात्र देशात सर्वात कमी पाऊस मराठवाडय़ात झाला आहे. मराठवाडय़ावर वरुण राजाची कायमच वक्रदृष्टी असते. यावर्षी मृग कोरडा गेल्यामुळे मूग, उडीद याचा पेरा झालेला नाही व आद्र्रा नक्षत्र सुरू होऊन आठवडा उलटला तरी पुरेसा पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. सोयाबीन, तूर या प्रमुख खरिपात होणाऱ्या पेरणीला धोका असल्यामुळे आता पुनर्वसू नक्षत्रात शेतकऱ्यांना बाजरी, मका अशा पिकांवरती अवलंबून राहावे लागणार आहे.
गोगलगायीचा प्रादुर्भाव
यावर्षी काही ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला अशा ठिकाणी गतवर्षी जिकडे गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला होता त्या गोगलगायी जमिनीच्या वर आल्याचे आढळून आले आहे. पाऊस आता पडला तर आगामी दहा-पंधरा दिवसांत प्रामुख्याने लातूर व उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांत गतवर्षी गोगलगायीचा फटका सोयाबीन व तुरीच्या पिकाला बसला होता. यावर्षी त्याचा धोका संभवतो. गोगलगायी पाऊस पडल्यानंतर वर येतात व त्या उभयिलगी असल्यामुळे समान वजनाच्या गोगलगायशी त्यांचा संपर्क आल्यानंतर दोन्ही किमान शंभर अंडी देतात, ती पुढच्या पिढीची बेगमी असते.
या कालावधीत गोगलगायी वेचणे स्नेककिल गोळय़ा ठेवणे किंवा बारदानामध्ये त्या एकत्र करणे किंवा चुरमुऱ्याला औषध लावून ते शेतात टाकणे असे उपाय करावे लागणार आहेत. याबाबतीत काळजी घेतली नाही तर खरिपाच्या पिकाला मोठा धोका उद्भवू शकतो, अशी भीती शास्त्रज्ञ डॉ. अरुण गुट्टे यांनी व्यक्त केली. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील शेतीत गोगलगाईचा उद्रेक आढळला आहे. कृषी विभागाच्यावतीने जनजागृती मोहीम हाती घेतली जाणार आहे. मात्र, यात शेतकऱ्यांनी अधिकाधिक जागरुकता दाखवण्याची गरज आहे. एकाचवेळी अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे.