शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी
शिर्डी : साईबाबांच्या शिर्डीत मुख्य उत्सवांपैकी असणार्या गुरुपौर्णिमा उत्सव येत्या दि.2 जुलैपासून तीन दिवसीय उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाची साईबाबा संस्थान प्रशासनाने जय्यत तयारी केली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी दिली. साई संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शंकर म्हणाले की, तीन दिवसीय या उत्सवाची सुरवात दि.2 रोजीच्या काकड आरतीने होणार असून द्वारकामाईमधून त्या दिवशी सकाळी साई सतचरित्र पारायणाची सुरवात केली जाणार आहे. उत्सवानिमित्ताने द्वारकामाई मधून साईबाबांची प्रतिमा, ग्रंथ, सटका, वीणा यांची मिरवणूक निघणार आहे. त्याचबरोबर मंदिराच्या समोरील प्रारंगणात कीर्तन, रुद्राभिषेक, भजन, हजेरीचे कार्यक्रम होणार आहे.
उत्सवाच्या तिसर्या दिवशी काल्याच्या कीर्तननाने समाप्ती होणार आहे. या निमीत्ताने फुलांची सजावट करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यातून सुमारे 29 पालख्या ह्या येत आहे. पदयात्रींना राहण्यासाठी 72 हजार चौ. फूट मंडपाची अतिरिक्त निवासस्थानाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रसादलयात उत्सवाच्या पहिल्या दिवशी मुगाचा शिरा, मुख्य दिवशी जिलेबी आणि समाप्ती दिनी बुंदी महाप्रसादामध्ये देण्यात येणार आहे. भक्तांना मंदिराजवळ येण्या-जाण्यासाठी 22 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये रेल्वेस्थानक, बस स्थानक, भक्तनिवास, प्रसादलय आदींचा समावेश करण्यात आला आहे.
संस्थान परिसरात 7 ठिकाणी तात्पुरते आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. 5 नवीन ठिकाणी लाडू काउन्टर सुरू करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस सुरक्षा वाढविण्याचे कळवण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाविकांच्या संख्येचा विचार करता यंदा प्रशासन 2 भाविकांच्या दर्शनाचे नियोजन करीत आहे.
साईबाबांना गुरू मानून त्यांच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी गुरुपौर्णिमा उत्सवाला भाविकांनी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गुरुपौर्णिमाला साई मंदिर राहणार रात्रभर उघडे
शिर्डीतील प्रमुख उत्सवांपैकी गुरुपौर्णिमा हा उत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यातून ठिकठिकाणांवरून पालख्या आणि इतर दळणवळण साधनांच्या माध्यमातून येणार्या साईभक्तांची गर्दी लक्षात घेता गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी दि.3 जुलै रोजी रात्रभर उघडे राहणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी दिली.
साई सेवकांना साई संस्थानचे आवाहन
शिर्डीमध्ये साईभक्तांची सेवा करण्यासाठी साईसेवक ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्याचा मनोदय आहे. त्यासाठी ज्या साईबाबा संस्थानमध्ये स्वतःहून सेवा द्यावयाची आहे. त्यांनी साईबाबा संस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरून ही सेवा करावी असे आवाहन करण्यात आले आहे.