दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजय विरोधात गुन्हा दाखल; अभिनेत्यावर आहे ‘हा’ आरोप
मुंबई: साऊथ सुपरस्टार थलपथी विजयचे चाहते फक्त दक्षिणेतच नाही तर भारतभर आहेत. त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी विजय चर्चेत असतो. एवढंच नाही तर तो भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा सुपरस्टार ठरला आहे.
विजयने आपल्या आगामी चित्रपटासाठी इतकी रक्कम घेत सर्व रेकॉर्ड्स मोडत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, ‘वारीसू’ नंतर, थलपथी विजय दिग्दर्शक लोकेश कनागराज यांच्या ‘लिओ’ नावाच्या आगामी चित्रपटात व्यग्र आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या सुरु आहे. ग्रेपवाइननुसार, थलपथी विजयला आगामी चित्रपटासाठी 150 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे.
पण आता हाच चित्रपट वेगळ्या करणामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटासाठी थलपथी विजयवर गुन्हा दाखल झाला आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या. अभिनेता थलपथी विजयच्या आगामी ‘लिओ’ चित्रपटातील ‘ना रेडी’ हे गाणे तंबाखूच्या सेवनाला प्रोत्साहन देत असल्या कारणाने वादात सापडले आहे.
या गाण्यात अभिनेता तोंडात सिगारेट घेऊन नाचताना दाखवण्यात आला होता. आता त्याच्यावर अंमली पदार्थ नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, ‘ना रेडी’ गाण्यात स्मोकिंग दाखवल्यामुळे थलपथी विजय कायदेशीर अडचणीत सापडला आहे. गाण्यात दारू आणि तंबाखूच्या सेवनाला प्रोत्साहन दिल्याबद्दल अभिनेत्याला टीकेचा सामना करावा लागला.
विजयने नुकत्याच झालेल्या भाषणात विद्यार्थ्यांचे चारित्र्य चांगले ठेवण्यावर भाष्य केले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये जपण्याचे आवाहन केले, तर त्यांची गाणी चित्रपटांमध्ये वाईट सवयींना प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येत असल्याने प्रेक्षक नाराज झाले. पण, त्याच्या चाहत्यांनी देखील अभिनेत्याच्या पाठीशी उभे राहून दावा केला की तो फक्त पडद्यावर अभिनय करतो आणि वास्तविक जीवनात अशा गोष्टींशी त्याचा काहीही संबंध नाही असं म्हणत ते त्याचं समर्थन करत आहेत. थलपथी विजयच्या ‘ना रेडी’ गाण्यावर प्रेक्षकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हे गाणे थलपथी विजयने गायले असून अनिरुद्ध रविचंदरने संगीत दिले आहे. व्हिडिओमध्ये काही BTS क्षण तसेच त्यांच्या नृत्याची झलक दाखवण्यात आली आहे. त्याच्या वाढदिवसाला पहिल्या पोस्टरसह हे गाणे रिलीज करण्यात आले. ‘लिओ’च्या फर्स्ट लूक पोस्टरने चाहत्यांच्या अपेक्षा आणखी एका उंचीवर नेल्या आहेत.
लोकांनी पोस्टरची तुलना ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’शीही केली. लोकेश कनागराज दिग्दर्शित, या चित्रपटात त्रिशा कृष्णन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हे दोन्ही कलाकार तब्बल 14 वर्षांनंतर पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. यात संजय दत्तचीही भूमिका आहे, जो चित्रपटात विजयच्या वडिलांचीही भूमिका करतो. यात गौतम वासुदेव मेनन, अर्जुन सर्जा, मिसस्किन, प्रिया आनंद, मन्सूर अली खान, मॅथ्यू थॉमस यांच्यासह दमदार स्टारकास्ट आहेत.