घाटात पुन्हा दरड कोसळली, मात्र वाहतूक सुरळीतच

चिपळूण : तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाला दमदार सुरवात झाली आहे. यातच परशुराम घाटात किरकोळ दरडी कोसळण्याच्या घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. घाटातील एकेरी मार्गाचे काँक्रीटीकरण पुर्ण झाले असून एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी देखील घाटात एक-दोन दगड रस्त्यावर आले होते.
गेल्या तीन वर्षापासून परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम रखडले होते. मात्र यावर्षी पावसाळ्यापुर्वी घाटातील डोंगर कटाई पुर्ण झाली असून काँक्रीटीकरणाचा एकेरी मार्ग पुर्ण झाला आहे. चौपदरीकरणातील बहुतांशी कामे मार्गी लागल्यानंतर पहिल्या पावसाळ्यात दरडीचा धोका जाणवू लागला आहे. सलग दोन दिवस झालेल्या पावसात दोनदा किरकोळ स्वरूपाच्या दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. शनिवारी महाड हद्दीत असलेल्या परशुराम घाटात डोंगरातील काही प्रमाणात दगड रस्त्यावर आले होते. मात्र त्याचा वाहतूकीवर परिणाम झाला नाही.
डोंगर कटाईनंतरच्या पहिल्याच पावसात दगड माती कोसळण्याचा धोका असल्याने दरडीच्या बाजूने एकेरी मार्गाने वाहतूक सुरू ठेवली आहे. डोंगराच्या वरील बाजूस असलेल्या घरांच्या सुरक्षेसाठी सरंक्षक भिंत उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र त्यास अद्याप सुरवात झालेली नाही. महाड हद्दीतील सरंक्षक भिंतीचा कामे अपुर्ण राहील्याने दरडीचा धोका कायम राहीला आहे. यामुळे परशुराम घाटातील प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यात आले आहे.