दिंडीत आजारी पडलेल्या पत्नीला घरी घेऊन येताना पतीचा मृत्यू

नीलगा: आषाढीसाठी पंढरपूरकडे जात असलेल्या पायी वारीत आजारी पडलेल्या पत्नीला दिंडीतून गावाकडे घेऊन येत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे घडली.निलंगा तालुक्यातील आनंदवाडी गौर येथील बालाजी गणपती चामे यांच्या पत्नी सुनंदा या आनंदवाडी गावातून पंधरा दिवसांपूर्वी आळंदी ते पंढरपूर या पायी वारीत सहभागी झाल्या होत्या. पायी चालत असताना त्या आजारी पडल्या. आजारी असल्याचा निरोप गावाकडे देण्यात आला. त्यामुळे पत्नीला आणण्यासाठी बालाजी चामे (वय ५९) हे रविवारी सकाळी आनंदवाडी गावातून बसने निघाले व माळशिरस तालुक्यातील वेळापूर या गावी असलेल्या पायी दिंडीतून पत्नीला घेऊन रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास गावाकडे ते निघाले.
बसस्थानकाकडे जाण्यासाठी एका ऑटोमध्ये बसत असताना अचानक चक्कर येऊन ते खाली कोसळले. त्यांना जवळील रुग्णालयात दाखल केले असता ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बालाजी चामे यांच्यावर आनंदवाडी येथील स्मशानभूमीत सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.