७ गुन्ह्यांची उत्कृष्ट उकल केल्याबद्दल पोलीस आयुक्तांनी पोलीस अधिकाऱ्यांचे केले कौतुक
मीरा रोड: वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ७ पोलीस अधिकाऱ्यांना मे महिन्यात गुन्ह्यांची उत्कृष्ट उकल केल्याबद्दल पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी पुरस्कार देत सत्कार केला.
मीरारोडच्या योगेश जैन यांची क्रिप्टो करन्सी मध्ये झालेल्या फसवणुकीची ३६ लाखांची रक्कम परत मिळवून दिल्याबद्दल सायबर सेलचे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर सह पथकास पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक दिले.
मांडवी पोलीस ठाणे हद्दीत भगत काम करणाऱ्या भिवा वायडाच्या हत्येचा गुन्हा उघडकीस आणून आरोपी विनोद बसवत ह्याचा शोध घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ व पथकाने अटक केली. विनोदची पत्नी परत यावी म्हणून भगत भिवा याने २ हजार घेतले. पण पत्नी काही परत न आल्याने त्याची हत्या केल . वाघ यांना उत्कृष्ट तपास बद्दल दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
मीरारोडच्या कोठारी ज्वेलर्समध्ये सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा आरोपीना शिताफीने अटक केल्याने गुन्हे शाखा १ चे अविराज कुराडे व मीरारोडचे वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह बागल यांना तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
विरारच्या काशीद कोपर येथील रेखा चौधरी यांच्या घरात २००८ साली सशस्त्र दरोडा टाकून फरार असलेल्या टेचर बंड्या काळे रा. पुसेगाव, सातारा ह्याला १५ वर्षांनी अटक केल्याबद्दल मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन बेंद्रे व पथकास स्पेशल रिवॉर्डचे पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक दिले गेले.
नालासोपारा येथील कावेरी ज्वेलर्स फोडण्याच्या गुन्ह्यातील आरोपी दिपकसिंग टाक ह्या खून, दरोडे सारख्या १० गंभीर गुन्हे असलेल्यास गुन्हे शाखा ३ चे निरीक्षक प्रमोद बडाख व पथकाने शिताफीने अटक केल्याबद्दल स्पेशल रिवॉर्ड २ चा पुरस्कार दिला.
माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत जयश्री मगजी ह्या वृद्ध महिलेस पैश्यांचे आमिष दाखवून लुबाडल्या प्रकरणी मूळच्या दिल्लीच्या चौघांना वरिष्ठ निरीक्षक संपत पाटील व पथकाने अटक केली. ६ गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल मिळवल्या बद्दल स्पेशल रिवॉर्डचे तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
वसई पोलीस ठाणे हद्दीतून १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तपास करत तिची तळोजा येथून सुटका केली व आरोपी शेर खान याला बेड्या ठोकणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांना स्पेशल रिवॉर्ड चे चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक आयुक्तांनी दिले.