ताज्या बातम्या

महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून चार नवे वाण


पुणे:तसेच फुले ऊस पाने काढणी व कुट्टी यंत्र, फुले भुईमूग शेंगा फोडणी व वर्गवारी यंत्र आणि फुले रस काढणी यंत्राला विद्यापीठ आणि कृषी आयुक्तालयाच्या संयुक्त बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ व राज्याचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील पशुसंवर्धन आयुक्तालय येथील कामधेनू सभागृहात मंगळवारी (दि. 20) विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समिती खरीप 2023ची बैठक कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी आयुक्त सुनील चव्हाण उपस्थित होते. तर व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, ‘आत्मा’चे संचालक दशरथ तांभाळे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक संशोधन डॉ. हरिहर कौसडीकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. चिदानंद पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, कृषी विस्तार सहसंचालक सुनील बोरकर, गणेशखिंड येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. रवींद्र बनसोड यावेळी उपस्थित होते.

आयुक्त सुनील चव्हाण म्हणाले, विद्यापीठाने आतापर्यंत 294 वाण, 1774 कृषी तंत्रज्ञान शिफारशी व 46 सुधारित अवजारे निर्माण केलेली आहेत. मागील वर्षी विद्यापीठाने काही पिकांचे 4 नवीन वाण, 69 शिफारशी व तीन सुधारित अवजारे निर्माण केली आहेत. कृषी विद्यापीठे ही ज्ञानाचा स्रोत आहेत आणि हे ज्ञान कृषी विभागामार्फत विस्तारित केले जाते. कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग हे शेतकर्‍यांसाठी कायम कार्यशील आहे. कृषी विभाग हे कृषी विद्यापीठ आणि शेतकर्‍यांमधील दुवा आहे. राज्याच्या कृषी विभागाचे कृषी विद्यापीठांना संपूर्ण सहकार्य असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

प्रास्ताविक डॉ. रवींद्र बनसोड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मोहन शेटे यांनी केले. तर डॉ. डी. बी. लाड यांनी आभार मानले.

…असे आहेत भात व मक्याचे नवे वाण :
1) भात फुले कोलम (व्हीडीएन 1832) हा अधिक उत्पादन देणारा निमगरवा, आखूड बारीक दाण्याचा वाण.
2) भात फुले सुपर पवना (आयजीपी 13-12-19) हा अधिक उत्पादनक्षम, बुटका, निमगरवा, सुवासिक, लांबट बारीक दाण्यांसह उत्तम गुणवत्ता असलेला वाण.
3) मका फुले उमेद (क्यूएमएच 1701) हा अधिक धान्य उत्पादन देणारा आणि मध्यम कालावधीत पक्व होणारा संकरित वाण.
4) मका फुले चॅम्पियन (क्यूएमएच 1819) हा अधिक उत्पादन देणारा, लवकर पक्व होणारा संकरित वाण.
…मान्यता मिळालेली यंत्रे :
1) उसाची पाने काढणे व कुट्टी करण्यासाठी ट्रॅक्टरचलित फुले ऊस पाने काढणी व कुट्टी यंत्र.
2) भुईमूग शेंगा फोडणे तसेच शेंगदाणे, फुटके शेंगदाणे, शेंगा आणि टरफले वेगवेगळे करण्यासाठी विद्युत मोटारचलित फुले भुईमूग शेंगा फोडणी व वर्गवारी यंत्र.
3) फळे आणि भाज्यांमधून रस काढण्यासाठी फुले रस काढणी यंत्र.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button