भारतीय संघात पुन्हा मुंबईकरांचे वर्चस्व
ते७० ते १९९० या काळात मुंबईतील खेळाडूंचा भारतीय क्रिकेट संघात भरणा असलेला पाहायला मिळायचे. आता जवळपास ३०-३५ वर्षांनी पुन्हा एकदा तसे चित्र पहावयास मिळणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या कसोटी व एकदिवसीय संघात मुंबईच्या पाच, तसेच पुण्यातील एक अशा एकूण सहा महाराष्ट्रातील खेळाडूंचा समावेश आहे. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल, शार्दूल ठाकूर हे चार मुंबईकर कसोटी संघात खेळणार असून पुण्याचा ऋतुराज गायकवाडही यावेळी कसोटी संघाचा भाग आहे. एकदिवसीय संघात मुंबईच्या सूर्यकुमार यादवला स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे एकंदर सहा महाराष्ट्राचे खेळाडू आपल्याला पुढील महिन्यात भारतीय संघाकडून खेळताना पाहायला मिळू शकतात. रोहित हा कसोटी तसेच एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे, तर कसोटी प्रकारात रहाणे उपकर्णधारपद भूषवेल. यशस्वी व ऋतुराज यांना कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते.
महिन्याच्या सुरुवातीला भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सध्या भारतीय संघात असंख्य बदल अपेक्षित असून भविष्याच्या दृष्टीने बीसीसीआयला युवा खेळाडूंना संधी देण्याचे ठरवले आहे.
महाराष्ट्रातील खेळाडू
रोहित शर्मा (कर्णधार, मुंबई)
अजिंक्य रहाणे (उपकर्णधार, मुंबई)
यशस्वी जैस्वाल (सलामीवीर, मुंबई)
शार्दूल ठाकूर (अष्टपैलू, मुंबई)
सूर्यकुमार यादव (फलंदाज, मुंबई)
ऋतुराज गायकवाड (सलामीवीर, पुणे)