ताज्या बातम्या

‘युरिया गोडाऊनमध्ये आहे’ म्हणताच दुकानदाराच्या कानशिलात लगावली


अमरावती : पाऊस न आल्याने पेरण्या थबकल्या असल्या तरी शेतकऱ्यांनी पेरणी व मशागतीसाठी आवश्यक असलेल्या बियाणे व खत खरेदीसाठी कृषी केंद्राकडे धाव घेतली आहे.अन्य खतांच्या तुलनेत युरियाला अधिक मागणी असून, बाजारात त्या खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर युरिया उपलब्ध नसल्याची बतावणी करणाऱ्या कृषिसेवा केंद्र संचालकाला मारहाण करण्यात आली.

गुरुवारी दुपारी कॉटन मार्केट चौकातील कृषी समृद्धी या प्रतिष्ठानात ती घटना घडली. कृषिसेवा केंद्र संचालकाला मारहाण करणाऱ्या ऑटो युनियनच्या नितीन मोहोड यांच्यासह त्यांच्यासोबतच्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी कृषिसेवा केंद्र संचालकांनी पोलिसांकडे केली. सुमारे चार तास प्रतिष्ठाने बंद ठेवली. घटनेनंतर अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता सेवा संघाने शहर कोतवाली गाठले तथा घटनेचा निषेध करून शहरातील सर्व कृषी साहित्य दुकाने बंद करण्यात आली.

पोलिस ठाण्यात शिष्टमंडळाने उपायुक्त विक्रम साळी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर लेखी तक्रारदेखील करण्यात आली. त्याचवेळी शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकारीदेखील नितीन मोहोड यांच्या सोबतीला आले. शिवसेनेचे सुनील राऊत व युवासेनेचे राहुल माटोडे यांनीदेखील युरियाच्या कृत्रिम तुटवड्याबाबत संबंधित कृषिसेवा केंद्र संचालकाला जाब विचारला. कृषी विभागाच्या वरदहस्ताशिवाय हा प्रकार शक्य नसल्याचा आरोप माटोडे यांनी केला. हा प्रकार न थांबल्यास प्रसंगी संबंधितांची धिंड काढण्याचा इशारा माटोडे यांनी दिला. कृषी अधिकाऱ्यांनी नियमित स्टॉक चेक करावा, शेतकऱ्यांना नेमके किती रुपयांचे बिल दिले जाते ते रेकार्ड तपासावे, अशी मागणी मोहोड यांनी केली.

नेमके घडले काय?

नितीन मोहोड यांनी आपल्या एका सहकाऱ्याला युरिया घेण्यास पाठविले. मात्र, काॅटन मार्केटमधील तीन दुकानदारांनी युरिया नसल्याचे सांगितले. त्यामुळे मोहोड हे कृषी समृद्धी नामक प्रतिष्ठानात गेले. तेथे रितेश राठी यांना जाब विचारला. आधी युरिया नसल्याचे सांगणाऱ्या त्या दुकानदाराने आता मात्र युरिया गोडाऊनमध्ये असल्याचे सांगितले. त्यामुळे आधी नाही का म्हटले, अशी विचारणा करून मोहोड यांनी राठी यांच्या कानशिलात लगावली. तेथील तू-तू, मै-मै वाढल्याने कृषी अधिकारीदेखील तेथे पोहोचले. कृषिसेवा केंद्र संचालकाला मारहाण केल्याचा व्हिडीओदेखील चांगलाच व्हायरल झाला.

दहाविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी रीतेश राठी यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी हॉटेल व्यावसायिक नितीन मोहोड यांच्यासह आठ-दहा जणांविरोधात जमाव जमविणे, मारहाण, शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड, कोतवालीचे ठाणेदार रमेश ताले यांनी परिस्थिती हाताळली. सुमारे दोन तास व्यावसायिक कोतवालीत होते.

कोतवालीत धाव

दरम्यान, अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता सेवा संघाचे पदाधिकारी मिलिंद इंगोले, दिनेश कडू, विरेंद्र शर्मा, निलेश गांधी, मनोहर अग्रवाल, प्रवीण उंबरकर, गिरिश राठी व अन्य कृषी साहित्य विक्रेते कोतवालीत दाखल झाले. आम्ही कृषी विभागाच्या निर्देशाने योग्य काम करणारी माणसे आहोत. सध्या प्रत्येक दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी असल्याने व हंगामामुळे खते व बियाणे गोडावूनमध्ये हलविण्यात आले आहे. मोहोड यांनादेखील युरिया गोडाऊनमध्ये उपलब्ध असल्याचे सांगितले होते, असे ते म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button