तंत्रज्ञानदशक’ बनविण्याचे उद्दिष्ट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
वॉशिंग्टन : विकासाचे चक्र गतिमान ठेवण्यासाठी भारत आणि अमेरिकेला बुद्धीमंतांचा ओघ कायम उपलब्ध असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.
हे दशक तंत्रज्ञानदशक बनविण्याचा आपला उद्देश असल्याचेही मोदी म्हणाले. शिक्षण आणि रोजगारक्षम मनुष्यबळ यांना भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश प्राधान्य देत असल्याचे त्यांच्या या भूमिकेतून दिसून आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी हे नॅशनल सायन्स फौंडेशनने (एनएफएस) आयोजित केलेल्या ‘भविष्यासाठी कौशल्यविकास’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा कार्यक्रम फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी आयोजित केला होता. उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये मनुष्यबळाचा पुनर्विकास करण्यावर आजच्या कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात शिक्षण, कौशल्य विकास आणि संशोधन या क्षेत्राच्या प्रगतीसाठी भारत सरकारच्या प्रयत्नांची माहिती दिली. भारत व अमेरिकेदरम्यान शैक्षणिक क्षेत्रातील देवाणघेवाणीबाबत समाधान व्यक्त करत शिक्षण व संशोधन क्षेत्रातील भागीदारीसाठी पाच कलमी प्रस्ताव मांडला.
मोदी म्हणाले,”येथे जमलेल्या तरुण आणि सर्जनशील लोकांना भेटण्याची संधी मला मिळाल्याबद्दल मी आनंदी आहे. ‘एनएसएफ’च्या सहकार्याने आम्ही भारतात अनेक प्रकल्प राबवित आहोत. युवकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शिक्षण, कौशल्य आणि नाविन्य यांची नितांत गरज आहे.
भारत सरकार याच दिशेने प्रयत्न करत असून त्यासासाठीच राष्ट्रीय शिक्षण धोरण आम्ही लागू करत आहोत. कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत आम्ही पाच कोटींहून अधिक जणांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले असून आणखी दीड कोटी जणांना प्रशिक्षण दिले जात आहे. विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी भारताबरोबरच अमेरिकेलाही बुद्धीमंतांचा ओघ कायम ठेवावा लागणार आहे. ”
मोदींचा पाच कलमी प्रस्ताव
सरकार, उद्योग व शिक्षण क्षेत्राला एकत्र आणण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन
शिक्षण आणि विद्यार्थ्यांचे आदानप्रदान करण्यास प्रोत्साहन
विविध विषयांवर दोन देशांदरम्यान हॅकॅथॉन स्पर्धांचे आयोजन
व्यावसायिक कौशल्य पात्रतेला एकमेकांच्या देशांत मान्यता
शिक्षण आणि संशोधन क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांच्या दौऱ्यांसाठी प्रोत्साहन
बड्या कंपन्यांना निमंत्रण
सेमिकंडक्टर क्षेत्राचा भारतात विकास करण्याचे प्रयत्न भारत सरकारकडून सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मायक्रॉन टेक्नॉलॉजी’ या कंपनीचे प्रमुख संजय मल्होत्रा यांची भेट घेत त्यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले.
सेमिकंडक्टरसाठी लागणाऱ्या विविध सुट्या भागांची पुरवठा साखळी निर्माण करण्यात भारत सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन मोदी यांनी या कंपनीला दिले. मोदी यांनी ‘ॲप्लाईड मटेरिअल्स’चे अध्यक्ष गॅरी डिकर्सन यांचीही भेट घेत त्यांना भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.
भारतात प्रक्रिया तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास करण्याबरोबरच कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शैक्षणिक संस्थाही उभारण्याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली. भारताच्या विमान वाहतूक आणि अपारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षेत्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपल्याला निमंत्रण दिल्याचे ‘जनरल इलेक्ट्रिक’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. लॉरेन्स कल्प यांनी सांगितले.
‘व्हाइट हाऊस’मध्ये जोरदार स्वागत
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘व्हाइट हाऊस’ येथे स्वागत केले. यानंतर एक छोटेखानी खासगी भोजन समारंभ झाला. ‘व्हाइट हाऊस’च्या बाहेरच छायाचित्रकारांनी बायडेन दाम्पत्य आणि मोदी यांची छायाचित्रे काढली. मोदी यांच्याबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार अजित दोवाल, परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा आणि राजशिष्टाचार विभागाचे उपप्रमुख असीम व्होरा हे ‘व्हाइट हाऊस’मध्ये उपस्थित होते.
जगातील सर्वांत उच्च दर्जाच्या शिक्षणसंस्था अमेरिकेत आहेत तर, भारत हा युवाशक्तीचा जगातील सर्वांत मोठा कारखाना आहे. भारत आणि अमेरिकेतील भागीदारी ही जागतिक विकासाचे शाश्वत इंजिन ठरेल.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान
अनेक वर्षांच्या दृढ संबंधांनंतर अमेरिका आणि भारत यांच्यातील भागीदारी आता सखोल आणि व्यापक झाली आहे. दोन्ही देश एकमेकांच्या सहकार्याने जागतिक आव्हानांना सामोरे जाऊ शकतात.
– जिल बायडेन, फर्स्ट लेडी