ताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुकोबारायांच्या स्वागतासाठी अकलूजनगरी सज्ज


अकलूज:उद्या शुक्रवार, दि. 23 रोजीचा सराटी (जि. पुणे) येथील शेवटचा मुक्काम आटोपून शनिवार, दि. 24 रोजी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अकलूज येथून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करीत आहे. अकलूज नगरपरिषदेच्या वतीने वैष्णवांच्या सुविधेसाठीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी अकलूजनगरी सज्ज झाली आहे.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अकलूज नगरपरिषदेने नियोजन करुन त्यांची कामे अंतिम टप्प्यात असल्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
अकलूज परिसरात पालखी सोहळ्यासाठी 10 टँकरने पाणीपुरवठा करणार आहे, तर पिण्याच्या पाणी फीडिंगसाठी तोरस्कर वस्ती माळेवाडी व भीमराव फुले यांचे दोन बोअर, आणि वापराचे टँकर फीडिंगसाठी अकलाईनगर व जुने पोलिस स्टेशन अशा दोन ठिकाणी टँकर ठेवण्यात येणार आहेत.

परिसरातील हातपंप, विहिरी, सार्वजनिक पिण्याच्या सर्व टाक्या स्वच्छता व दुरुस्ती करत आहेत. महिलांकरिता अंघोळीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल, नवीन बाजारतळ, अकलाई नगर यासह आठ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. येथेही पाण्याचे टँकर उपलब्ध करणार आहेत. पालखी मार्गावरील शहरातील स्ट्रीट लाईट दुरुस्ती व दिंड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पाण्याचे, विजेचे व स्वच्छतेचे नियोजन केले आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आपत्कालीन कक्ष, चौकशी कक्ष व आरोग्य कक्ष नगरपरिषदेमार्फत उभारण्यात येत असून रिंगण सोहळ्यासाठी लाकडी बॅरिंगेटिंग व मंडपाची व्यवस्था केली आहे.

गर्दीच्या ठिकाणी जड वाहनास प्रवेश बंदी करण्यासाठी संत नरहरी नगरकडे जाणारा रस्ता, राऊत नगर, आनंद नगर, शहा धारशी पंप, अ‍ॅक्सिस बँक, महावीर स्तंभाकडे जाणारा रस्ता अशा सहा ठिकाणी सुरक्षा बॅरिगेटिंग लावून मार्ग बंद करण्यात येणार आहेत.
परिसरातील गटारी, नाले स्वच्छ करुन सोहळ्यापूर्वी व सोहळ्याच्या प्रस्थानानंतरही जंतुनाशक फवारणी करणार असल्याचे दयानंद गोरे यांनी सांगितले.

शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्याने सदाशिवराव माने विद्यालयाच्या सुमारे साडेतीन एकर मैदानावर पालखी सोहळ्यातील गोल रिंगणाची तयारीही अंतिम टप्प्यात आहे. रिंगण सोहळ्यासाठी 86 मीटरचा व्यास असलेला गोल तयार करण्यात येत असून मधोमध पालखीच्या विसाव्यासाठी मंडप उभारला आहे, तर मुख्य स्टेजवर पालखी मुक्कामासाठी थांबणार आहे. या ठिकाणी लाखो वैष्णवांना हा रिंगण सोहळा पाहता यावा याकरिता सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असून पालखीच्या दर्शनासाठी दर्शन रांगेचेही बॅरिगेटिंग बांधण्यात येत आहे. दर्शन व्यवस्थेसाठी अकलूज परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संघटना, गणेश व नवरात्र मंडळे, विविध युवा मंच सेवा देणार आहेत.

1000 तात्पुरत्या शौचालयांची उभारणी

स्वच्छतेकरिता कृषी उत्पन्न बाजार समिती येथे 50, विजयसिंह मोहिते क्रीडा संकुल 100, नवीन बाजारतळ 50, नामदेव मंगल कार्यालय 50, कर्मवीर बाबासाहेब माने-पाटील सभागृह 50, पाटीदार भवन 50, मुसूदमाळा 100, शंकरराव मोहिते महाविद्यालय 100, शिवरत्न मोटर्स 50, सदाशिवराव माने विद्यालय येथे 100, उदयरत्न टाऊनशिप 50, अकलाई देवी मंदिर परिसर 50, शंकरनगर व संग्रामनगर 200 अशी तात्पुरत्या स्वरुपातील शौचालये उभारण्यात येणार आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button