ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाचे कार्यालय पाडले
मुंबई: वांद्रे पूर्व रेल्वे स्टेशनलगत ऑटो रिक्षांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. हे टाळण्यासाठी आता येथील रिक्षा स्टँडचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.
यासाठी मोठ्या जागेची गरज असल्यामुळे ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाचे पत्र्याने बांधलेले कच्चे अनधिकृत कार्यालय गुरुवारी मुंबई महानगरपालिकेने पाडले. या नव्या रिक्षा स्टँडसाठी ठाकरे सेनेचाच आग्रह असल्यामुळे या कारवाईला त्यांचा आक्षेप नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
वांद्रे पूर्व रेल्वे स्टेशनबाहेर बांद्रा-कुर्ला संकुलसह शासकीय वसाहत व अन्य ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेअर ऑटोरिक्षा आहेत. या ऑटोरिक्षा वाटेल तेथे उभ्या राहत असल्यामुळे स्टेशन लगतच्या रोडवर नेहमीच वाहतूक कोंडी असते. या रस्त्यालगत ऑटो रिक्षा स्टँड असून ते अपुरे पडत आहे. त्यात स्टँडमध्ये ये-जा करण्याचा मार्ग एकच असल्यामुळे प्रवाशांनाही स्टेशन बाहेर पडताना अडचणी येतात. त्यामुळे येथे ऑटोरिक्षा स्टँड बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी मोठ्या जागेची गरज होती. त्यामुळे ठाकरे सेनेचे माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांचे पत्र्याचे कच्चे कार्यालय तोडून तेथे नव्याने रिक्षा स्टॅन्ड उभारण्यात येणार आहे. येथे शिवसेना पुरस्कृत ऑटो चालक वेल्फर असोसिएशन यांचा बोर्ड आहे.
बांद्रा पूर्वेला शिवसेनेची शाखा मुंबई महापालिकेने पाडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे काही शिवसैनिक तेथे जमा झाले होते. पण ही शाखा नसून माजी नगरसेवकाचे अनधिकृत कार्यालय होते. व ते कार्यालय नवीन रिक्षा स्टँडसाठी त्यांच्या सहमतीने पाडण्यात आल्याचे समजले. दरम्यान या कारवाईला आमचा कोणताही विरोध नसल्याचे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक शेखर वायंगणकर यांनी स्पष्ट केले.