समान नागरी कायदा आणा; पाठिंबा देऊ : उद्धव ठाकरे
मुंबई: काश्मिरातील 370 कलम हटविण्यात आले तेव्हा आम्ही पाठिंबाच दिला होता. आता समान नागरी कायदा आणणार असाल, तर त्यालाही पाठिंबा आहे; पण आधी हा समान नागरी कायदा काय आहे, हे लोकांसमोर स्पष्ट करा.त्याचा हिंदूंना किती त्रास होणार, हेही सांगा, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केले.
समान नागरी कायदा आणताना राज्यकर्ते म्हणून आधी सर्वांना समान वागणूक द्या. दुसर्या पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा विचार समान आहे का, असा सवालही त्यांनी केला. वरळी येथील एनएससीआय संकुलात शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यभरातील पदाधिकार्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी वीर सावरकर तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपकडून होणार्या आरोपांचा समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे गटावर टीकेची झोड उठवली.
कर्नाटक सरकारने पाठ्यपुस्तकातून सावरकरांचा धडा वगळण्याचा निर्णय घेतला त्यावर ठाकरेंचे मत काय, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर देवेंद्रजींची परिस्थिती सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी हालाखीची झाली असल्याची टीका त्यांनी केली.
कर्नाटक सरकारने सावरकरांचा धडा वगळला आहे, याचा शिवसेना निषेध करतेच; पण सावरकरांनी कष्ट करून, मरणयातना भोगून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याच देशात एखादी विचारधारा देश तिच्या जोखडाखाली आणू इच्छिते आहे. त्यामुळे तुम्ही सावरकरप्रेमी असाल, तर आधी देश स्वतःच्या बुडाखाली घेणार्या तुमच्या नेत्याचा निषेध करा, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.
पाटण्यातील बैठकीसाठी जाणार
येत्या 23 तारखेला विरोधकांच्या बैठकीसाठी पाटण्याला जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले. पूर्वी ‘मातोश्री’वर भाजपचे लोक यायचे. आता भाजपसोडून सगळे येतात. पाटण्यात भाजपेतर पक्षांची, देशप्रेमींची एकजूट होणार आहे. त्यावर पंतप्रधानपदाचा चेहरा कोण वगैरे प्रश्न केले जातात; पण देशातील लोकशाही आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येत आहेत. देश मजबूत असायला हवा की सरकार, याचा निर्णय आता जनतेला करावा लागणार आहे.
यापूर्वी वाजपेयी, नरसिंह राव यांनी चांगले सरकार चालवले. त्यानंतर आताचे मजबूत सरकार आले आणि देशाचे तुकडे पडतील की काय, अशी स्थिती झाली आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.
तेे म्हणाले की, शिवसेना उत्तमपणे सरकार चालवू शकते, हे लोकांना दाखवून दिले आहे. आपण केलेली कामे लोकांना पटवून द्या.
निवडणुकीचे वर्ष सुरू झाले आहे. मोठ्या प्रमाणावर पैसा ओतला जाणार आहे; पण कर्नाटकने विजयाचा मार्ग दाखविला आहे. दहा वर्षांतील कामगिरीची झाडाझडती घेण्याची वेळ आली आहे. भाजपची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. भाजप हे माझ्यासमोरचे आव्हान नाही; पण जे पायंडे पाडत आहेत ते आव्हान असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्यासह मेळाव्याला आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई, अंबादास दानवे, साईनाथ दुर्गे, सुषमा अंधारे आणि किशोरी पेडणेकर यांनीही संबोधित केले.