विठ्ठल नामाच्या जयघोषात अश्व रिंगण सोहळा संपन्न
अंबाजोगाई:येथील योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी (दि.१८) सायंकाळी विठ्ठल नामाच्या जयघोषात अश्व रिंगण सोहळा पार पडला. संतश्रेष्ठ नरसी नामदेव व गंगाखेड येथील संत जनाबाई या पालख्यांच्या एकत्रीकरणातून येथे हे अश्व रिंगण झाले.
यात वारकऱ्यांच्या फुगड्या व बाल वारकऱ्यांनी मनोरे सादर केले.
पंढरपूरला आषाढी यात्रेसाठी निघालेल्या संत जनाबाई व संत नामदेव यांच्या पालख्यांचे सायंकाळी सहा वाजता योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावर आगमन झाले. भगव्या पताका हाती घेतलेल्या वारकऱ्यांनी गोल रिंगण केले. बघता, बघता या रिंगणात अश्व फिरवण्यास सुरूवात झाली. हरीनाम व विठ्ठल नामाच्या जयघोषात अश्वानेही रिंगणात फिरण्याचा वेग घेतला. डोळ्याचे पारणे फेडणारा हा अश्वरिंगण सोहळा बघण्यास शहर व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. महिलांची संख्याही मोठी होती.
संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी उपस्थित महाराज व वारकऱ्यांचे स्वागत केले. या अश्वरिंगणानंतर याच रिंगणात वारकऱ्यांनी फुगड्या व कुस्त्यांवरही ठेका धरला होता. टाळ, अभंगाच्या तालात वारकरी या खेळात दंग झाले होते. बाल वारकऱ्यांनी मनोरे सादर करून उपस्थितांना चकित केले.
यावेळी कार्याध्यक्ष बाबा जवळगावकर, प्रकाश बोरगावकर, दिलीप गित्ते, दिलीप सांगळे, सारंग पुजारी, अनिकेत डिघोळकर, अनंत अससुडे आदींनी यासाठी पुढाकार घेतला.
वेशभुषा व दिंडी स्पर्धा
या निमित्त पालखीचे आगमन होण्यापूर्वी याच मैदानावर शालेय विद्यार्थ्यांची वेशभूषा व दिंडी स्पर्धा झाली. त्यात विविध शाळेच्या संघांनी सहभाग घेऊन वेशभूषा सादर केली.