मान्सूनची पश्चिम बंगालमध्ये मुसंडी; महाराष्ट्राला प्रतीक्षाच
पुणे: आगामी पाच दिवस देशाच्या बहुतांश भागांत उष्णतेची लाट राहणार आहे. मान्सूनने पश्चिम बंगालमध्ये मुसंडी मारली असून, दक्षिण भारतातील काही भागांत तो पुढे जात आहे
मात्र, तूर्तास महाराष्ट्रात त्याची प्रगती नाही. बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानात पूर्ण शमले. मात्र, तेथे जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गुजरात, राजस्थान वगळता अन्यत्र मोठा पाऊस नाही. महाराष्ट्रात मान्सूनला अजूनही अनुकूल स्थिती मिळाली नसल्याने तो रत्नागिरीतच आहे. मात्र, पश्चिम बंगाल व बिहारमध्ये प्रगती करीत आहे. उर्वरित देशात मात्र अजूनही कडक उन्हाळाच सुरू आहे. आगामी पाच दिवस देशाच्या बहुतांश भागांत उष्णतेची लाट राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
विदर्भात अजूनही पारा 40 ते 42 अंशांवर असून, गडचिरोली (42.3), चंद्रपूर (42.6), वाशिम (41) गोंदिया (40)
ही शहरे उन्हाळ्यासारखीच तापली आहेत. अजून आठवडाभर ही लाट कायम राहील, असा अंदाज आहे. देशातील ओडिशा, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा या भागांत उष्णतेची लाट तीव्र आली आहे.
सुती कपडे घाला, भरपूर पाणी प्या
हवामान विभागाने सावधानतेचा इशारा देत, उन्हापासून बचाव करण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत. यात जेथे उष्णतेची लाट तीव्र आहे तेथील नागरिकांनी बाहेर पडताना सुती कपडे घाला, भरपूर पाणी, सरबत प्या. तसेच लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना दुपारी 1 ते 4 या वेळेत विनाकारण बाहेर नेऊ नका, असा सल्ला दिला आहे.