ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोस्टात मिळते सर्वाधिक व्याज; २ हजार महिलांकडून गुंतवणूक


पणजी : केंद्र सरकारने यंदापासून महिलांसाठी खास महिला सन्मान बचतपत्र योजना सुरू केली आहे. २०२३ या आर्थिक वर्षामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना महिलांवर विशेष भर दिला होता.
त्यानुसार पुढील दोन वर्षांसाठी ही योजना कार्यान्वित राहणार आहे. गोवा पोस्ट खात्याकडून या योजनेसाठी विशेष मोहीम राबवली होती. यात गोव्यातून महिला वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळाला. २,००० हून अधिक महिलांनी पैसे गुंतवले आहेत.

दोन हजारांची उघडली खाती

महिला महिला सन्मान बचतपत्र योजनेसाठी राज्यात आतापर्यंत सुमारे दोन हजार महिलांनी गुंतवणूक केली आहे. योजनेत कुणाला पैसे गुंतवायचे असतील तर पोस्ट कार्यालयात येऊन संपर्क करू शकता.

योजना दोन वर्षांसाठीच

महिला सन्मान बचतपत्र योजना ही केवळ दोन वर्षांसाठीच म्हणजेच २०२३ ते २०२५ या काळासाठी असेल. महिला किंवा मुलींच्या नावे लाखो रुपये गुंतवून चांगले व्याज मिळू शकते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासोबतच नवीन अल्पबचत योजना सुरु करण्याच्या हेतूने पोस्टाने ही योजना आणली आहे.

योजनेसाठी पात्र कोण?

देशातील सर्व महिला महिला सन्मान बचतपत्र योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. योजनेसाठी १० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलीसाठीही खाते उघडले जाऊ शकते. गोव्यात सदर योजना यशस्वी करण्यासाठी पोस्ट खात्याने विशेष मोहीम राबवली होती.

७.५ टक्के व्याजदर

महिला सन्मान बचतपत्र योजनेअंतर्गत महिला दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवू शकतात. यावर ठेवींवर ७.५ टक्के इतका निश्चित व्याजदर असेल. दोन वर्षांनी त्यांना दोन लाख ३२ हजार ४४४ इतके रुपये मिळतील. जर कुणाला एकाचवेळी दोन लाख रुपये गुंतवणे शक्य नसेल ते सुरुवातीला एक लाख रुपये व त्यानंतर दर तीन महिन्यांनी उर्वरित रक्कम भरू शकता.

महिला सन्मान बचतपत्र योजना ही महिलांसाठी अल्पबचतीच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे. ७.५ टक्के व्याजदर या योजनेवर दिला जात आहे. एका वर्षांनंतर हवे असल्यास गुंतवणूकदार गुंतवलेल्या रकमेपैकी ४० टक्के रक्कम काढू शकता. – राजेश मडकईकर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, पणजी पोस्ट खाते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button