सहा वर्षांपूर्वी सोशल मीडियावर चर्चेत आलेली ही शेतकरीकन्या सध्या काय करते?
माणदेशी माणूस प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारा आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाच्या छायेत वावरलेला इथला माणूस लढत राहतो;त्याचं लढणं हे निसर्गाच्या अवकृपेमुळ त्याच्यात येतं.माणदेशी माणसाचं झुंजारपण, त्याची जगण्याची लढाई आणि वेगळेपण आजवर कौतुकाचा विषय बनले आहे.
व्यंकटेश माडगूळकर यांनी ‘माणदेशी माणस’ या पुस्तकातून काही माणदेशी व्यक्तिरेखा मराठी साहित्यात अजरामर केल्या आहेत.आजही मराठी साहित्यात माणदेशी माणस वाचकांना भावतात. 2017 सालच्या उन्हाळ्यात माणदेशी मुलूखातील एका मुलीची बातमी आणि हा फोटो सोशल मीडियावर फिरत होता.
बातमी अशी होती,माण तालुक्यातील गटेवडी नावाच्या एका खेड्यातील भीमराव खरात हे मेंढ्या घेऊन त्यांच्या बायकोसह परमुलुखात गेले आहेत त्यांचे आईवडील आणि त्यांची मूल गावात रहातात. मनीषा खरात ही सगळ्यात मोठी मुलगी.ती बारावीत शिकत होती . शिकत असतानाच ती आजी आजोबांना आणि लहान भावंडांना सांभाळत आहे.फार कष्टाळू मुलगी आहे अशा बातमीचा विषय..
त्यावर्षी झालं होतं असं,माण तालुक्यात चांगला पाऊस पडला.या पावसानंतर लोकांनी मशागती सुरू केल्या. मनिषाला वाटलं आपणही वडिलांच्या शेताची मशागत करावी. कारण मेंढ्या घेऊन वडील परत यायला उशीर होईल.मग तिने नातेवाईकांकडून बैलजोडी व औत आणले आणि स्वतः कुळवणी सुरू केली. अर्थात तिला याअगोदर औत चालवायचं शिक्षण मिळालं आहे. पण या वर्षी ती पहिल्यांदाच स्वतः औत चालवू लागली . ती रानात कुळवत असताना रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाटसरूने तिचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यांनतर काही स्थानिक पत्रकार तिला भेटले.पत्रकारांना ती मुलगीच कुळव चालवणं विशेष वाटत होतं,पण त्या मुलीला त्यात काही विशेष वाटत नव्हतं.ती सहजपणे बोलत कुळव चालवत होती. कुळव चालवल्यामुळे बातमीचा विषय बनलेली माणदेशी कन्या मनिषा वृत्तपत्राच्या रकान्यावर आलीच पण सोशल मीडियावरही तिचा फोटो सोशल मीडियावरून फिरू लागला.या फोटोच्या निमित्तानं मनिषाचे वेगळेपण समोर येत असतानाच मेंढ्या घेऊन परमुलुखात जाणाऱ्या पालकांच्या मुलांचे काही प्रश्न समोर आले. रस्त्यावरून कार चालवणारी मुली सर्रास दिसतात. पण कुळव चालवणारी?नाही. आणि बैल जुंपून कुळव चालवणं कार चालवण्यापेक्षा थोरच आहे.
वडील परत येण्याची वाट पहात न बसता स्वतः उन्हातान्हात रानात उतरलेली मनीषा खरंच ग्रेट. सहा वर्षांपूर्वी सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली मनीषा आता काय करते? हा प्रश्न पडतो.