ताज्या बातम्याबीडमहाराष्ट्र

गावा गावात सहजपणे उपलब्ध होणार्‍या अवैध हातभट्टीच्या दारू विक्री थांबवावी


अंबाजोगाई:बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात विशेषतः अंबाजोगाई ,केज आणि धारूर तालुक्यात गल्लोगल्ली अवैधरित्या अतिशय सहजपणे उपलब्ध होणारी हातभट्टी, देशी दारू यावर पायबंद घालून विक्री करणार्‍यांवर कार्यवाही करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे मनस्विनी प्रकल्पाच्या पुढाकाराने विविध महिला संघटनांनी जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ व पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे केली आहे. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तसेच जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढतच आहे. कुटुंप्रमुखाच्या दारूच्या व्यसनाच्या आहारी जाण्याने देखील बालविवाह होतात असे निदर्शनास आले आहे. अंबाजोगाई, केज आणि धारूर परिसरातील महिलांनी गावात सहज उपलब्ध होणार्‍या हातभट्टीच्या अवैध दारूविक्रीच्या विरोधात बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय दीपा मुधोळ- मुंडे मॅडम व जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना निवेदन दिले.

दारूबंदीसाठी यापूर्वीही अनेक आंदोलने झाली. चोरट्या मार्गाने दारू गावामध्ये उपलब्ध होते त्याचा परिणाम तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता यावर होतो आहे. परंतु दारूबंदी विभागातील अधिकार्‍यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. गावात हातभट्टीत तयार होणारी दारू मागेल त्याला आणि मागेल त्या जागी पोहोचवली जाते दारूची किंमत कमी आहे परंतु त्यामुळे गाव पातळीवर भांडण, महिलांना शिवीगाळ, घरात मारहाण, घरादारात भांडण असे प्रकार वाढले आहेत.

शाळकरी मुलांमध्ये सुद्धा दारूचे वाढत असल्याचे दिसून येत आहे. अंबाजोगाई परिसरातील अनेक गावांनी प्रामुख्याने साकुड आणि चिचखंडी या गावातील महिलांनी पोलीस अधीक्षक यांनाअनेकवेळा निवेदन देऊन दारूबंदीसाठी कळकळीची विनंती केली.मात्र या मागणीकडे जाणूनबुजून कानाडोळा केला जात असल्याचे येथील महिलांनी नमूद केले आहे. कुटुंप्रमुखाच्या दारूच्या व्यसनाधीनतेमुळे घरातील बारा-चौदा वर्षाची मुले देखील दारूकडे वळत असतील तर आम्ही जगायचे कसे अशी आर्त विनवणी त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. मनस्विनी महिला प्रकल्पाच्या पुढाकाराने हे निवेदन देण्यात आले. प्रा.डॉ.अरुंधती पाटील, प्रतिभा देशमुख ,शोभा तरकसे, मंगलबाई सूर्यवंशी , साठे ताई, गडदे ताई यांच्यासह विविध गावातील महिला प्रतिनिधी यांनी वरील मागणीचे निवेदन सादर केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button