चिमणी पाडकामाचा खर्च तीन कोटींच्या घरात
सोलापूर : श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या को-जनरेशनच्या चिमणी पाडकामासाठी ठेकेदाराला १ कोटी १७ लाख, शिवाय पाडकाम मोहिमेच्या दोन दिवसात आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देण्यावर झालेला खर्च आणि परजिल्ह्यातून मागविलेला पोलिस बंदोबस्त असा एकूण चिमणीच्या पाडकामाच्या खर्चाचा आकडा साधारण तीन कोटींच्या घरात गेला आहे. दरम्यान, चिमणी पाडकामाच्या खर्चाची ही रक्कम कारखान्याकडून वसूल करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. तथापि, बंदोबस्तासाठीचा झालेला खर्च महापालिका देणार की शासन याबाबत अद्याप तरी अस्पष्टता आहे. चिमणी पाडकामावर झालेल्या खर्चाच्या आकड्याची गोळाबेरीज महापालिकेत त्या त्या विभागाकडून केली जात आहे.
श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या को जनरेशन चिमणी पाडकामासाठी मंगळवारपासून महापालिका आणि पोलिस प्रशासन यांची यंत्रणा कामाला लागली. गुरुवारी (ता. १५) तिसऱ्या दिवसापर्यंत पाडकामाची मोहीम सुरू होती. पाडकामासाठी महापालिकेने हैदराबादच्या मक्तेदाराला १ कोटी १७ लाखाचा मक्ता दिला होता. तसेच दोन दिवसांत विविध विभागांतून आवश्यक असलेली यंत्रणा, कर्मचाऱ्यांचे जेवण, पाणी व आवश्यक साहित्य या सर्व गोष्टींवर साधारण वीस लाखांचा खर्च झाल्याचे सांगण्यात आले.
सन २०१७ मध्येही चिमणी पाडकामाच्या कारवाईसाठी बेंगलोरच्या मक्तेदाराला नऊ लाखाचा ॲडव्हान्स दिला होता. महापालिका प्रशासनाचा चिमणी पाडकामावर साधारण दीड कोटी इतका खर्च झाला आहे.
कारखाना स्थळावर, गावोगावी, टोलनाका आदी ठिकाणी ३५ तासांसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दिवस-रात्र पहारा सुरू होता. त्यासाठी नाशिक, जळगाव, बीड अशा विविध जिल्ह्यांतून पोलिसांचा मोठा फौजफाटा मागविण्यात आला होता.
या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांचे भोजन ,पाणी, वाहतूक आदींचा खर्च साधारण ५० लाखांच्या घरात आहे. महापालिकेने केलेला खर्च हा मिळकत करामध्ये लावून त्याची वसुली केली जाऊ शकते. परंतु, पोलिस प्रशासनाच्या खर्च शासन करणार की त्याच्या वसुलीसाठी महापालिकेला पत्र देणार याबाबत अस्पष्टता आहे.
शासन व प्रशासनाने चिमणी पाडून माझे दीड हजार कोटींचे नुकसान केले आहे. त्यात एक-दोन कोटी फार विशेष नाही. त्यांची नोटीस आल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर सल्ला घेण्यात येईल. त्यानंतर पुढील निर्णय असणार आहे. माझ्यासाठी हा विषय गौण आहे.
चिमणी पाडकामासाठीचे मक्तेदाराला १ कोटी १७ लाख रुपये हे यापूर्वीच निश्चित झाले आहे. या व्यतिरिक्त दोन दिवसात झालेल्या खर्चाबाबत त्या-त्या विभागाकडून खर्चाची माहिती येणे बाकी आहे. त्यानंतरच आकडा निश्चित होईल.
– लक्ष्मण चलवादी, नगरअभियंता, महापालिका, सोलापूर