कत्तलखान्यात नेणार्या ८ गायी पकडल्या; एकाला अटक
हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा शिवारात एका वाहनातून ८ गायी कत्तलखान्याकडे आज (दि. १७) सकाळी ११ वाजता नेल्या जात होत्या. बाळापूर पोलिसांनी हे वाहन पकडून या गायींची सुटका केली. या प्रकरणी चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर कारवाई केली जात आहे.
कळमनुरी तालुक्यातील कामठा फाटा येथील आठवडी बाजारातून काही गायी कत्तलखान्यात नेल्या जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, श्रीधर वाघमारे, जमादार प्रभाकर भोंग, रोहिदास राठोड यांच्या पथकाने आज सकाळपासूनच वारंगाफाटा शिवारात वाहनांची तपासणी सुरु केली होती.
दरम्यान, सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास एका वाहनाची तपासणी केली असता त्यात 8 गायी कोंबून बसविण्यात आल्याचे दिसून आले. पोलिसांनी चालकाकडे विचारणा केली असता त्याने सदर गायी कामठा फाटा येथून घेतल्या असून त्या अर्धापूर येथे नेल्या जात असल्याचे सांगितले. पोलिसांनी या सर्व गायी वारंगाफाटा शिवारात उतरवून त्यांच्या चार्याची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली . पोलिसांनी चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.