नीट परीक्षेत आशिष भराडीया दिव्यांगांमध्ये देशात पहिला
नाशिक:राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या नीट युजी 2023 परीक्षेचा निकाल काल मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत आशिष भराडीया हा विद्यार्थी दिव्यांगांमध्ये देशात प्रथम आला.
या परीक्षेत 720 पैकी 690 गुण मिळवत त्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर राष्ट्रीय क्रमवारीत त्याने 722 वे स्थान मिळवले आहे.
आशिषला लहान असताना ऐकू येत नव्हते, त्यामुळे त्याच्या कानावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती. मात्र त्याने आपल्या अभ्यासात सातत्य ठेऊन दिव्यांगावर मात करत देशात पहिला क्रमांक मिळवला. आशिष हा नाशिक येथील सुप्रसिध्द बालरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद भराडीया आणि डॉ. वैशाली भराडीया यांचा मुलगा आहे. तर भाऊ विश्वेश भराडीया दिल्लीतील एम्सममध्ये कार्यरत आहेत. भराडीया कुटुंबातील आशिष हा चौथ्या क्रमांकाचा डॉक्टर होणार आहे.
आशिषने देखील नीट परिक्षेच्या तयारीसाठी प्रचंड मेहनत घेतली. त्याचबरोबर आशिषने खासगी क्लास लावला होता. तो दररोज किमान आठ तास अभ्यास करत होता. सातत्यपूर्ण अभ्यासामुळेच हे यश मिळाले असल्याची भावना आशिषने व्यक्त केली आहे. आशिष व्यतिरिक्त तामिळनाडूतील प्रबंजन जे आणि आंध्र प्रदेशातील बोरा वरुण चक्रवर्ती 99.99 टक्क्यांसह देशात प्रथम तर राज्यात श्रीनिकेत रवीनं पहिला क्रमांक पटकावला आहे. श्रीनिकेत रवी हा देशातून सातव्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, देशभरातून 20,38596 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यातील 1145976 विद्यार्थी हे पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहे. यामध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेश राज्याचे 1,39,961 विद्यार्थी परीक्षेच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी पात्र ठरले आहे त्यानंतर महाराष्ट्राचे1,31,008 विद्यार्थी आणि राजस्थान राज्यातील 1,00,316 विद्यार्थी हे सर्वाधिक पात्र ठरले आहे.