भक्तीचा महापूर; दिवस-रात्र रांगा लावून पालखीचे दर्शन
पुणे: ‘पूर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या, बांधू विठ्ठल सांगडी, पाेहुनि जाऊ पैल थडी!’याच भावनेने पुणेकरांना मंगळवारी भक्तीचा महापूर अनुभवता आला. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी साेहळा मुक्कामी असल्याने दिवस-रात्र रांगा लावून भाविकांनी पालखींचे दर्शन घेतले. बुधवारी पहाटे चारला दोन्ही पालख्या पंढरीकडे मार्गस्थ होणार आहेत.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने १० जूनला देहूतून, तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने ११ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान केले. दोन्ही पालख्यांचे सोमवारी (दि. १२) पुण्यात आगमन झाले होते. संत तुकोबांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात आणि संत ज्ञानोबांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात दोन दिवस मुक्कामी विसावल्या. मंगळवारी दिवसभर पालख्यांचे दर्शन पुणेकरांनी घेतले.
पुढील मुक्काम येथे
संत तुकाराम महाराज पालखी हडपसरला दुपारचा विसावा घेऊन १४ जूनला लोणी काळभोर येथे मुक्कामी असेल. तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी हडपसरमार्गे दिवे घाटातून सासवडला मुक्कामी पोहाेचेल. तेथे १४ व १५ जूनला मुक्काम असेल.
पालखी मार्गांवर महिलांसाठी चेंजिंग रूम
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या मानाच्या व अन्य पालख्यांमधील महिलांसाठी पालखी मार्गावर स्नानासाठी पाणी व कपडे बदलण्यासाठी शेड उभारण्यात येणार आहेत. मार्गावरील ग्रामपंचायत, नगरपरिषद व जिल्हा प्रशासनाकडून ही सोय केली जाणार आहे. एका वेळी किमान ५० ते १०० महिलांना अंघोळ करण्यासाठी शॉवर बसवण्यात येणार आहे.
संत निळोबाराय पंढरीच्या दिशेने
जवळे (जि. अहमदनगर) : प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथील संत निळोबाराय महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे बुधवारी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे.
मंगळवारी परंपरेप्रमाणे ही पालखी पिंपळनेर येथील निळोबाराय महाराज यांच्या वाड्यातून निळोबाराय महाराज समाधी मंदिरात आणण्यात आली.
यावेळी संत तुकाराम महाराज यांचे वंशज माणिक महाराज मोरे उपस्थित हाेते. पालखीचा पहिला मुक्काम राळेगणसिद्धी येथे राहील.