मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा आगडोंब, ९ ठार
मणिपूर:मागील काही दिवसांपूर्वी हिंसाचारात होरपळलेला मणिपूर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. आज (दि.१४) सकाळी झालेल्या हिंसाचारात ९ जण ठार झाले असून, १० जण जखमी झाले आहेत.इम्फाळ पूर्वेकडील खमेनलोक भागात आज सकाळी झालेल्या हिंसाचारात ९ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत, अशी माहिती इंफाळ पूर्वचे पोलीस अधीक्षक शिवकांता सिंग यांनी ‘एएनआय’दिली.
लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, गेल्या २४ तासांत राज्यातील खमेनलोक भागात झालेल्या गोळीबारात एका महिलेसह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी इंफाळमध्ये हलविण्यात आले आहे. मणिपूरमध्ये जातीय संघर्षांमुळे एका महिन्यापेक्षा जास्त काळ तणावपूर्ण आहे.
एक महिन्यापूर्वी मणिपूरमधील मेईतेई आणि कुकी समुदायाच्या लोकांमधील वांशिक हिंसाचारात किमान १०० लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि ३१० जण जखमी झाले होते. मणिपूरच्या १६ पैकी ११ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू आहे, तर संपूर्ण ईशान्येकडील राज्यात इंटरनेट सेवा बंद आहे.
हिंसाचाराचे कारण काय?
मेतेई समुदायाच्या अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीला विरोध करण्यासाठी पहाडी जिल्ह्यांमध्ये 3 मे 2021 रोजी ‘आदिवासी एकता मार्च’ आयोजित केल्यानंतर प्रथम संघर्ष झाला. मणिपूरच्या लोकसंख्येच्या सुमारे ५३ टक्के मेतेई समुदाय आहे. त्यांचे वास्तव्य इंफाळ खोऱ्यात आहे. आदिवासी नाग आणि कुकी लोकसंख्येच्या आणखी ४० टक्के आहेत आणि ते डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.