घरकाम करणार्या महिलेवर बलात्कार
पनवेल : एका घरकाम करणार्या महिलेचे काम सुटल्यानंतर कामासाठी फिरत असताना खारघरमधील एका नराधमाने या असहाय महिलेला आधार देण्याचा बहाणा करून आपल्या घरी नेवून तिच्यावर बळजबरी अत्याचार केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याबाबत पीडित महिलेने खारघर पोलिसात गुन्हा दाखल केला असून आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मूळची आंध्रप्रदेश येथील महिला खारघर येथे राहून घरकाम करून आपला उदरनिर्वाह करीत होती. ती काम शोधण्यासाठी खारघरमध्ये फिरत असताना आरोपी अन्वर शेख याच्या नजरेस सदर महिला पडल्यानंतर अन्वर याने मी तुला कामाला लावतो, असे खोटे सांगून आपल्या घरी नेले.
यावेळी त्याने आपल्या पत्नीला देखील सदर असहाय महिलेला आधार देण्यासाठी मी घरी घेवून आलो आहे, असे सांगितले आणि तिला काम मिळाले की ती भाड्याने घर घेवून राहणार आहे. यावेळी त्याच्या पत्नीने त्याच्यावर विश्वास ठेवला.
मात्र दुसर्या दिवशी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपी अन्वर शेख हा सदर पीडित महिला झोपली होती त्या ठिकाणी जावून तिच्याशी बळजबरी करू लागला. याबाबत महिलेने प्रतिकार केला असता त्याच्यासमोर ती महिला असमर्थ राहिली.
अखेर सदर प्रकाराची चीड आल्याने महिलेने थेट खारघर पोलीस ठाणे गाठून न्याय मागितला.
यावेळी खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पवार यांनी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत अधिक तपास खारघर पोलीस करीत आहेत.