ताज्या बातम्या

मोफत वीज योजना भाडेकरूंनाही लागू होणार : मुख्यमंत्री


बेगळुरू :कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारने राज्यातील प्रत्येक घरात दोनशे युनिट वीज मोफत देण्याचे आश्‍वासन दिले आहे. गृह ज्योती नावाने ही योजना राबवण्यात येत असून त्याचा लाभ भाडेकरूंनाही दिला जाईल असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी सांगितले.या योजनेंतर्गत मोफत विजेचा लाभ घेण्यासाठी कॉंग्रेस सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्याच्या एक दिवसानंतर राज्य सरकारने ही भूमिका स्पष्ट केली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, भाड्याच्या घरात राहणाऱ्यांनाही आम्ही मोफत वीज (200 युनिटपर्यंत) देऊ. 200 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या गरीब लोकांना बिल भरावे लागणार नाही. ही योजना भाडेकरूंना लागू असेल, असे सिद्धरामय्या यांनी पत्रकारांना सांगितले. ही योजना व्यावसायिक वापरासाठी लागू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 2023 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसने दिलेल्या 5 हमीपैकी एक ‘गृह ज्योती’ योजना होती.

कॉंग्रेसने दिलेल्या योजनांच्या हमी मध्ये सरकार चालढकल करीत असल्याचा आरोप भाजपने आत्तापासूनच सुरू केला आहे. त्याविषयी विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, सत्तेत असताना भाजपने राज्य लुटले आणि राज्याचे नाव बदनाम केले असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. भाजप नेते विरोध करत आहेत कारण त्यांना दुसरे काही करायचे नाही. त्यांना कोणते नैतिक अधिकार आहेत?असा सवाल त्यांनी केला.

सिद्धरामय्या यांच्या म्हणण्यानुसार, भाजपने 10 तास मोफत वीज, शेती कर्ज माफ करणे आणि सिंचनावर 1.5 लाख कोटी रुपये खर्च करणे यासारखे कोणतेही निवडणूक आश्वासन पूर्ण केले नाही. हे लोक (भाजप) लोकविरोधी आहेत. सत्तेत असताना त्यांनी लूट केली, लाचखोरी केली, राज्याचे नाव बदनाम केले आणि नंतर ते निघून गेले. ते आम्हाला उपदेश करायला येतात तेव्हा काय बोलावे?

दरम्यान, वीज दरात 2.89 रुपये प्रतियुनिट वाढ आणि गोहत्या विरोधी कायद्याबाबत राज्याचे पशुसंवर्धन मंत्री के व्यंकटेश यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपने पुकारलेले आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू होते. बेंगळुरू, म्हैसूर, दावणगेरेसह राज्याच्या विविध भागांत निदर्शने झाली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button