जेव्हापासून भाजप सत्तेत तेव्हापासून सतत वातावरण का दुषित होतंय? सुप्रिया सुळेंचा सवाल

“मला गंमत आणि आश्चर्य एका गोष्टीचे वाटते की जेव्हापासून भाजप सरकार सत्तेत आले आहे तेव्हापासून सारखे वातावरण दुषित का होते आहे?” असा थेट सवाल खा. सुप्रिया सुळे यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला. कोल्हापूरात घडलेल्या घटनेवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
नगरची घटना घडली आता कोल्हापूरमध्ये घटना घडली आहे सारखेच तणावाचे वातावरण राज्यात कसे होते असा सवाल करतानाच अशाच गोष्टी घडत राहिल्या, दंगली होत राहिल्या तर यामुळे राज्याचे नुकसान होणार आहे अशी भीती व्यक्त केली. शिवाय जनता ही घाबरलेली व बिथरलेली आहे त्यामुळे हे गृहमंत्रालयाचे अपयश असल्याचा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला.
देशातून भाजपला विरोध
“देशातून किती विरोध होतो आहे हे आता भाजपच्या लक्षात आले आहे. आंदोलन करणार्या मुलींचे गार्हाणं ऐकायला इतके दिवस का लागले? याचा अर्थ त्यांना अपयश दिसत आहे, देशातून रोष दिसत आहे. या देशातील प्रत्येक महिलेला राग आला आहे. ज्या सरकारने ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ चा नारा दिला त्यांनी त्यांच्या बेटीला न्याय दिला नाही. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भाजपच्या विरोधात द्वेष आणि राग आहे. आंदोलनकर्त्या मुलींवरील अन्याय केला आहे ही चूक भाजपच्या लक्षात आल्यावर शेवटी ‘देर आये दुरुस्त आये,” असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.