मुसळधार पावसाने नदीला पूर; श्रीगोंद्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
श्रीगोंदा : शहरासह तालुक्याच्या बहुतांश भागात काल मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने महावितरणचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, तालुक्यातील चिखली शिवारात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला. यावर्षी उन्हाळ्यात तापमानाने चाळीशी पार केली होती. परिणामी, सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहात होते. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील मागील तीन दिवसापासून वातावरणात बदल होऊन दिवसभर कडाक्याचे ऊन तर सायंकाळी वादळीवारे आणि आभाळ येत होते.
रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा शहरासह काष्टी, कोळगाव, कोरेगाव, ढोकराई, मढेवडगाव, लोणी व्यंकनाथ, वडाळी या भागासह बहुतांश भागात सुरुवातीला वादळी वाऱ्याने हजेरी लावत शेतकऱ्यांसह नागरिकांची त्रेधा तिरपिट उडविली. तालुक्यातील चिखली परिसरात सुमारे दोन तास मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत ओढ्या-नाल्यांसह नदीला पूर आला. उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला असला तरी शेतातल्या उभ्या पिकांच्या चिंतेनं शेतकऱ्यांची झोप देखील उडाली आहे.