अरबी समुद्रात तयार होतंय नवं चक्रीवादळ, तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान पाहा
मुंबई: राज्यात अनेक ठिकाणी 4 जून रोजी मुसळधार पावसाने हजेरी लावली, मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबई भागात मात्र उकाडा अजूनही कायम आहे. पुणे, सातारा, जळगाव, भुसावळ इथे झालेल्या मुसळधार पावसानं मोठं नुकसान झालं आहे.
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं झाडं उन्मळून पडली, तर काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल जाणून घेऊया. दक्षिणपूर्व अरबी समुद्रात ५ जूनच्या सुमारास चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांत याच भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रावरील चक्रीवादळासाठी महासागराची स्थिती अनुकूल आहे. त्यामुळे हे चक्रीवादळ तयार झालं तर त्याचा मान्सूनवर कसा परिणाम होणार याकडे देखील हवामान विभागाचं लक्ष असणार आहे. 8 ते 10 जून दरम्यान कर्नाटक आणि महाराष्ट्र किनार्याजवळ आणि 9 ते 12 जून या कालावधीत गुजरातच्या किनार्यालगत आणि समुद्राजवळच्या भागातील स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चक्रीवादळावर हवामान विभाग बारीक लक्ष ठेवून आहे. त्याचे प्रत्येक अपडेट्स लोकांपर्यंत पोहोचवत आहे.
मराठवाड्यात आज पुन्हा एकदा पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर विदर्भ आणि मुंबईत कमालीची उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील असं हवामान विभागाने म्हटलं आहे. सांगोला तालुक्यातील काळूबाळूवाडी येथे वीज पडून एक मेंढपाळ मृत्यू झाला तर एक शेळीही मरण पावली. जळगावच्या चोपडा तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातील चुंचाळे चौगाव मामलदे परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक घरांचे छताचे पत्रे उडाले.
भुसावळ शहरात आज अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला असून मोठ्या प्रमाणात वादळ आल्याने शहरातील मध्यवर्ती भागात वर्दळीच्या ठिकाणी एका इमारतीच्या सहवे मजल्यावरील भिंत कोसळली.