नाशिक : किल्ल्याची प्रतिकृतीतून बनलेल्या घरामुळे ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा ध्वनी आपसूक उमटतोय
आपले घर असावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यातही ‘एक बंगला बने न्यारा’ची तुप्त भावनाही असते. हा इमला रचन्यासाठी मग प्रत्येक जण आपापल्या यथाशक्ती प्रयत्नांची पराकाष्टा करतो.त्यातून आकाराला येणारे घर जेव्हा इतरांच्याही कौतुकाचा विषय ठरतो, तो आनंद काही औरच. असेच एक स्वप्न मालेगावच्या पठ्ठ्याने सत्यात साकारले असून, त्यांचा बंगला पाहिला की ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा ध्वनी आपसूक उमटतो. हो कारण हे घर किल्ल्याची प्रतिकृती आहे.
मालेगाव : या लक्षवेधी सदनाला सुभेदार तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज कुणाल मालुसरे, अक्षय बांदल आणि मंथनराव जगताप यांनीही भेट देऊन कौतुक केले.
जाजुवाडी (भायगाव) परिसरात राहणारे शिवभक्त डॉ. संतोष रामदास पाटील यांनी ही किमया साधली आहे. मूळचे वडगावचे रहिवासी असणारे पाटील हे सर्वसाधारण कुटूंबातून पुढे आले. वडिल मोटार वाईंडिंगची काम करायचे. परंतु, त्यांनी दोन्ही मुलांना उच्चशिक्षित केले. ज्येष्ठ चिरंजिव संतोष यांनी धुळे येथे शिक्षण पूर्ण करुन इलेक्ट्रापॅथी ही पदवी संपादन केली. शिक्षणादरम्यान, त्यांच्या वाचनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास आला अन् ते शिवरायांच्या विचारांनी भारले. यातूनच त्यांना जेव्हा कधी घर बांधेल तेव्हा त्यात छत्रपतींचा वास असेल, शिवशाहीतील रत्नांची तिथे उपस्थिती जाणवेल जी प्रत्येकाला स्वराज्याची अनुभूती देईल, अशी संकल्पना सुचली आणि ती त्यांनी सत्यात उतरवली.मालेगाव : बैठक खोलीत अष्टप्रधान मंडळासारखी करण्यात आलेली आसनव्यवस्था.
भायगाव रोडवरील स्वामी समर्थ मंदिराजवळ 1500 स्वेअर फुट आकाराचे हे दुमजली हे घर बांधण्यात आले असून, ते आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. त्यास किल्ला आणि राजवाड्याचा आकार दिला गेलाय. सरंक्षक भिंत बुरुजासमान आणि तसेच प्रवेशद्वार. त्याठिकाणी दोन आणि टेरेसवर एक अशा तीन तोफा ठेवण्यात आल्या आहेत. केवळ बाह्य भागच नव्हे तर अंतर्गत सजावटही राजेशाही आहे. बैठक खोली ही दरबाराप्रमाणे असून, अभ्यागतांना अष्टप्रधान मंडळासारखी आसनव्यवस्था केली आहे. भिंतीवर सिंहासनावर विराजमान शिवराय, छत्रपती संभाजी महाराज तसेच सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, जिवा महाला, शिवा काशिद, बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शेलार मामा आदी स्वराज्यातील रत्नांची छायाचित्र लावलेली आहेत. शिवरायांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी, स्वराज्याची राजधानी रायगड, पुरंदर, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सज्जनगड, तोरणा, पन्हाळा आदी गड-किल्ल्यांच्याही लक्षवेधी प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. कोणत्याही वास्तुविशारदाची मदत न घेता, केवळ अनुभवलेल्या गड-किल्ल्यांची मनात कोरलेली प्रतिमा आणि कल्पनांना डॉ. पाटील यांनी विकासकाकडून साकारल्यात. साधारण अडीच वर्षात हे बांधकाम पूर्ण झाले. त्यास जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनीदेखील भेट देऊन कौतुक केले.
व्यसनमुक्ती अन् पावित्र्याचा संदेश
पदोपदी शिवरायांची छबी असल्याने या वास्तुला पावित्र्याची वेगळी किनार लाभली आहे. हे पावित्र्य राखले जावे, यासाठी डॉ. पाटील यांनी व्यसनी लोकांना प्रवेश नाकारला आहे. ‘गुटखा खाणार्या, मद्यपींना घरात प्रवेश नाही, अशी पाटीच झळकवलीय. शिवाय, गड-किल्ले हे महाराष्ट्राचा अभिमान आहेत, त्यांची नासधूस टाळावी, असे संवर्धन व्हावे की ते पुन्हा गतवैभवाला पोहोचावेत, असा संदेश देण्यात आला आहे.
कोरोना योद्धा
डॉ. पाटील हे सहा-सात वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहेत. अल्पदरात ते रुग्णसेवा देतात. कोविड काळातही त्यांनी या सेवेत खंड पडू दिला नाही. मनपाच्या सहारा कोविड सेंटरपासून बाराबलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडुकाका बच्छाव यांनी सुरु केलेल्या राम रहिम कोविड सेंटरमध्येदेखील त्यांनी सेवा दिली. या दरम्यान ते अथवा त्यांच्या कुटुंबातील कुणीच बाधित झाले नाही, हे विशेष. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांनी कोरोना योद्धा म्हणून गौरवले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमित, त्यांचा वारसा, विचार पुढे जात राहावा, यासाठी किल्ल्ल्याप्रमाणे घराची बांधणी केली. शिवरायांच्या जन्मस्थळापासून त्यांनी अद्वितीय असे कर्तृत्व गाजवलेल्या गड-किल्ल्यांना भेटी दिल्या असून, त्यांच्या संवर्धनासाठी खारीचा वाटा उचलला आहे. – डॉ. संतोष रामदास पाटील, शिवभक्त.