शेती : हवामानाचा अंदाज कुठे आणि कसा बघायचा?
शेतीसंदर्भातला प्रत्येक निर्णय घेण्याआधी हवामान अंदाजाची अचूक माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. हवामानाचा अंदाज थेट शेतकऱ्याच्या खिश्यावर परिणाम होतो त्यामुळे त्याची योग्य माहिती कशी आणि कुठे मिळवायची हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
भारतीय हवामान विभागाचा अंदाज हा हवामानाच्या अंदाजाचा अधिकृत स्रोत समजला जातो. याशिवाय कृषी विद्यापीठांच्या परिसरात हवामान केंद्रे स्थापन केलेली असतात. तिथेही हवामानाचे अंदाज व्यक्त केले जातात.
स्कायमेट ही हवामानाचा अंदाज देणारी खासगी संस्था आहे. भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेट यांनी वर्तवलेल्या अंदाजाची आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असते.
भारतीय हवामान विभागाचा अंदाज बघण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
या वेबसाईटवर दिसत असलेल्या Warnings या भागात विशेष काही इशारा असेल, तर त्याची तारीख आणि जिल्हानिहाय तसंच विभागनिहाय माहिती दिलेली असते.
Nowcast या भागात पुढच्या काही तासांत हवामानासंबंधी काही इशारा आहे का, याची जिल्हानिहाय आणि हवामान केंद्रानिहाय माहिती दिलेली असते.
Our Services या रकान्यात Rainfall information या भागात तुम्ही तुमच्या राज्यातील तुमच्या जिल्ह्यात गेल्या काही तासांत किती पाऊस झाला, याची नोंद केलेली असते.
तर Monsoon या भागात मान्सून कुठपर्यंत पोहोचलाय, त्याची काय स्थिती आहे ते तुम्ही पाहू शकता.
Cyclone या भागात पुढच्या काही तासांमध्ये वादळाची शक्यता आहे, ते सांगितलेलं असतं.
याशिवाय भारतीय हवामान विभागाच्या यूट्यूब चॅनेलवर दररोज संध्याकाळी देशातल्या हवामानाच्या अंदाजाविषयी माहिती दिली जाते. तीसुद्धा तुम्ही पाहू शकता. इथं दिवसभरातील हवामान आणि पुढच्या काही तासांतील हवामानाचा अंदाज यांची माहिती सांगितली जाते. हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत ही माहिती दिली जाते.
स्कायमेट या संस्थेच्या हवामानाचा अंदाज संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेला असतो. इथं जाऊन तो पाहता येऊ शकतो.
या वेबसाईटवर हवामानासंबंधीच्या बातम्या हिंदी, इंग्रजी आणि मराठीत वाचायला मिळतात. हवामानाच्या अंदाजासंबंधीचे नकाशे आणि व्हीडिओही इथं पाहायला मिळतात.