ट्रेनिंगसाठी ‘अग्निवीर’चे बनावट कॉललेटर, नगरमध्ये सहा आरोपींना अटक
सेन्यदलात ‘अग्निवीर’ म्हणून भरती झाल्याचे बनावट कॉल लेटर घेऊन नगरमधील लष्कराच्या केंद्रावर प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या चौघा तरुणांना लष्कराच्या अधिकाऱयांनी पकडले. या चौघांसह त्यांना बनावट कॉल लेटर देणाऱया दोघांसह सहाजणांवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्वांना अटक करण्यात आली आहे. आदर्श कुशावह (वय 19), मोहितकुमार यादव (वय 25), आनंदशाम शर्मा (वय 23), अंशू पटेल (वय 20, सर्व रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश), लोकेशकुमार तेजपालसिंग राजपूत व गोपाल रामकिशन चौधरी (दोघे रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. नगर) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत सुभेदार शिवाजी काळे (आयटी बटालियन एमआयसी ऍण्ड एस. सोलापूर रोड, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
मंगळवारी (दि.23) रात्री उत्तर प्रदेशातील आदर्श, मोहितकुमार, आनंद, अंशू हे चौघे त्यांच्या नावाचे कॉल लेटर घेऊन एमआयसी ऍण्ड एस सोलापूर रोड दरेवाडीच्या गेट नं. 3 वर आले. त्यांची कागदपत्रे बटालियनचे आर. पी. हवालदार तलविंदरसिंह यांनी तपासली असता, त्यांच्या कॉल लेटरवर कर्नल विजयसिंह (एआरओ मेरठ) असे नाव आणि सही होती. मात्र, एआरओ सेंटरचा शिक्का नसल्याने त्यांना शंका आली. त्यांनी मेरठच्या एआरओ यांच्याकडे चारजणांच्या भरतीबाबत चौकशी केली असता, तेथे या नावाचे कोणीही भरती झाले नसल्याचे कळाले.
‘अग्निवीर’मध्ये भरती झालेल्या मुलांची माहिती असलेल्या ‘आसान ऍप’वर तपासणी केली असता, तेथेही त्यांची नावे आढळली नाहीत. लष्करी अधिकाऱयांनी त्या चौघांकडे हे कॉल लेटर कोणी तयार करून दिले, याची चौकशी केली. त्यावेळी लोकेशकुमार राजपूत व गोपाल चौधरी यांनी बनवून दिलेले असून, ते दोघे नगरमध्ये असल्याची माहिती दिली. त्यानंतर भिंगार पोलिसांत सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.