‘कोळशा’मुळे मध्य रेल्वे कोट्यधीश!
पुणे : मध्य रेल्वेने मार्चअखेर सरलेल्या आर्थिक वर्षात ८.१८ कोटी टन मालवाहतूक केली. यात सर्वाधिक वाटा खनिज कोळशाचा असून, सिमेंट दुसऱ्या स्थानी आहे. चालू आर्थिक वर्षासाठी मध्य रेल्वेने मालवाहतुकीचे ९ कोटी टनांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.मध्य रेल्वेची वरिष्ठ विभागीय परीचालन व्यवस्थापकांची वार्षिक परिषद नुकतीच झाली या बैठकीला सरव्यवस्थापक नरेश लालवानी, अतिरिक्त महाव्यवस्थापक आलोक सिंग आणि प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक मुकुल जैन उपस्थित होते. या वेळी मध्य रेल्वेच्या परीचालन विभागाचे कोचिंग विभाग, नियोजन विभाग आणि मालवाहतूक विभागाचे प्रमुख तसेच मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर विभागांचे परीचालन विभाग प्रमुख उपस्थित होते.
मध्य रेल्वेची मालवाहतूक आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ८.१८ कोटी टन होती. चालू आर्थिक वर्षासाठी (२०२३-२४) मालवाहतुकीचे उद्दिष्ट ९ कोटी टन निश्चित करण्यात आले आहे. मागील आर्थिक वर्षात मालवाहतुकीत खनिज कोळशाचे प्रमाण सर्वाधिक होते. खनिज कोळशाची ३.७ कोटी टन वाहतूक करण्यात आली. त्याखालोखाल सिमेंटची ८८ लाख टन वाहतूक झाली.
मध्य रेल्वेने नवीन लोहमार्गांचे जाळे विस्तारले आहे. भुसावळ-जळगाव ही २४.१३ किलोमीटरची तिसरी आणि चौथी लाईन पूर्ण करण्यात आली आहे. याचबरोबर जळगाव-पाचोरा ही नवीन ४७.५९ किलोमीटरची तिसरी लाईनही पूर्ण झाली आहे. नागपूर-वर्धा तिसरी व चौथी लाईन, भुसावळ-खांडवा तिसरी व चौथी लाईन आणि नागपूर-इटारसी, भुसावळ-वर्धा, जळगाव मनमाड तिसरी लाईन यांची कामे प्रगतीपथावर आहेत.