निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंचं आता ‘अंडरकवर मिशन’; खास टीमवर जबाबदारी
मुंबई : राज्यात होणाऱ्या विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट अॅक्टिव झाला आहे. शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे हे निवडणुकांसाठी एक ‘अंडरकवर मिशन’ राबवणार असल्याची माहिती समोर येत आहे या मिशनंतर्गत उद्धव ठाकरे यांची माणंस तळागाळात जाऊन प्रचार करणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी ते मुख्यमंत्री असताना जी काम केली आहेत, त्याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला जाणार आहे. गावाच्या चावडी आणि पारावर जाऊन प्रचार करण्यात येणार आहे. गुप्त मिशन मात्र या मिशनचं वैशिष्ट म्हणजे ज्या व्यक्तिंवर ही जबाबदारी सोपवण्यात येणार आहेत त्या व्यक्ती फक्त उद्धव ठाकरे यांनाच माहिती असणार आहेत. या मिशनपासून शिवसेना ठाकरे गटाचे सर्व नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना दूर ठेवलं जाणार आहे. सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली कामं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या कामांची माहिती उद्धव ठाकरेंची ही खास टीम लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. एवढंच नाही तर सुप्रीम कोर्टाच्या निकालातील प्रमुख मुद्दे देखील ही टीम जनतेसमोर मांडण्याचं काम करणार आहे.
पक्षाच्या स्थितीचा आढावा घेणार या माध्यमातून गाव, तालुका आणि जिल्हापातळीवर पक्षाची काय परिस्थिती आहे? याचा आढावा घेतला जाणार आहे. या आढाव्यानंतर एक सविस्तर रिपोर्ट बनवून तो उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. आगमी विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची ही रणनिती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.