जागावाटपाबाबत संजय राऊत स्पष्टच बोलले; “आमचा १९ आकडा कायम राहील, पण…”
मुंबई:आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे.परंतु अद्याप जागावाटपाचा कुठलाही फॉर्म्युला ठरला नाही. लवकरच प्रमुख नेत्यांची बैठक होईल. त्यात जागावाटपाची चर्चा होईल. आमचा १९ चा आकडा कायम आहे. आम्ही या जागा जिंकलेल्या आहेत असा खुलासा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत म्हणाले की, लोकसभेच्या १९ जागा जिंकून आम्ही आलो आहोत. त्यातील काही सोडून गेले पण जागावाटप करताना तिन्ही पक्षात समन्वय साधताना काहीठिकाणी तडजोडी कराव्या लागतील, तोडगा काढावा लागतील हे सत्य आहे. तडजोडीचा फायदा भाजपाला मिळणार नाही. महाविकास आघाडी मजबूत आहे. १९ आकडा कायम राहील. महाराष्ट्रात शिवसेना १९ आकडा कायम ठेवेल, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. प्रमुख नेत्यांची बैठक होईल त्यात निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं.
निवडणुका घेण्यास टाळाटाळ का?
मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेण्यासाठी टाळाटाळ का करताय? मुंबई, ठाण्यासह १४ महापालिका निवडणुका घ्या, मोदींना प्रचाराला आणा, कुणालाही प्रचाराला आणावे, निवडणुका घ्या, जनमत कुणाच्या बाजूने आहे हे कळेल असा इशाराही राऊतांनी भाजपाला दिला आहे.
आम्ही यादी तयार करत आहोत…
विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून दबाव टाकला जातो. आम्ही लढाई लढत आहोत. जयंत पाटील खंबीरपणे तपासाला सामोरे जातायेत. राजकीय दबावाचे हे षडयंत्र आहे. काही गोष्टी आम्ही करत नाही, मान्य करत नाही त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून गुडघे टेकवायला लावतात. पण आम्ही ते करत नाही. २०२४ नंतर ईडीच्या कारवाईला कुणाला पाठवायचे आणि किती तास बसवायचे याची यादी आम्ही तयार करत आहोत असंही संजय राऊत म्हणाले.
आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री, मग चुकीचं काय?
नागपूर दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लावलेत त्यावर पत्रकारांनी संजय राऊतांना प्रश्न विचारला तेव्हा लोकांच्या भावना असतील तर भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले त्यात चुकीचे काय? लोकांनी प्रेमाने हे बॅनर लावलेत त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही असं विधान केले.