ताज्या बातम्या

सत्तेचा फॉर्म्युला, 1 मुख्यमंत्री 3 उपमुख्यमंत्री


कर्नाटक:कर्नाटकात एक मुख्यमंत्री आणि तीन उपमुख्यमंत्री असा सत्तेचा फॉर्म्युला काँग्रेसने जवळपास निश्चित केला आहे. त्यात मुख्यमंत्रीपदासाठी कर्नाटकच्या विजयाचे शिल्पकार असलेले सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार या दोन नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असून या दोन्ही नेत्यांना हायकमांडने दिल्लीत पाचारण केले आहे.
दरम्यान, सिद्धरामय्या दिल्लीत पोहचलेत, तर शिवकुमार यांनी ऐनवेळी दिल्लीवारी रद्द केल्याने सस्पेन्स वाढला असून कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार, याचा फैसला आता उद्याच होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी कुरुबा समाजातील सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यासोबतच वोक्कलिगा समाजातील डी. के. शिवकुमार, लिंगायत समाजातील एम. बी. पाटील आणि वाल्मिकी समाजातील सतीश जारकीहोळी या तीन नेत्यांना उपमुख्यमंत्री म्हणून संधी देत सामाजिक समतोल साधला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची मते जाणून घेतल्यानंतर केंद्रीय निरीक्षक सुशीलकुमार शिंदे, जितेंद्र सिंह, दीपक बाबरिया हे आज दिल्लीच पोहचले. या त्रिसदस्यीय समितीने आपला अहवाल राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिला आहे. खरगे आणि काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हे निवड प्रक्रिया पुढे नेणार आहेत. खरगे हे काँग्रेस हायकमांड अर्थात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना संपूर्ण तपशील देतील त्यानंतर निर्णय अंतिम होईल, असे सांगण्यात आले.

सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोन्ही नेत्यांना विश्वासात घेऊनच मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतला जाणार असून आता उद्याच कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण याचे उत्तर मिळणार आहे. उद्या संध्याकाळी विधिमंडळ नेत्याची घोषणा करण्यात येऊ शकते, असे काँग्रेस नेते एच. के. पाटील यांनी सांगितले.

शेवटची दोन वर्षे शिवकुमार मुख्यमंत्री?
पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन त्यानुसार काँग्रेस कर्नाटकात आखणी करणार आहे. शिवकुमार हे सध्या प्रदेशाध्यक्ष असून त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले. त्यांच्या या संघटनकौशल्याचा फायदा लोकसभा निवडणुकीतही व्हावा म्हणून तोपर्यंत शिवकुमार यांच्याकडेच हे पद ठेवले जावे असा सूर आहे. त्यामुळे पहिली तीन वर्षे सिद्धरामय्या मुख्यमंत्री आणि त्यानंतर पुढची दोन वर्षे शिवकुमार मुख्यमंत्री असा आग्रह हायकमांडकडे धरला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवकुमार यांना मुख्यमंत्री केल्यास त्यांच्या मागे पेंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागू शकतो, हा मुद्दाही विचारात घेतला जात असल्याचे सांगण्यात आले.

शिवकुमार यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द
शिवकुमार आज सायंकाळी दिल्लीत येणार होते, पण ऐनवेळी त्यांनी आपला दिल्ली दौरा रद्द केला. पोटात दुखत असल्याने तसेच अंगात ताप असल्याने मी आज दिल्लीला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. कर्नाटकात काँग्रेसचे 135 आमदार आहेत. माझ्याकडे एकही आमदार नाही आणि कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार हा निर्णय मी पक्षाच्या हायकमांडवर सोडला आहे, असेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button